महाविकास आघाडीतील धुसफूस, शरद पवार, अजित पवार यांच्या वेगवेगळ्या भूमिका, मध्येच नाना पटोले आळवत असलेला वेगळा राग आणि दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्येही सातत्याने होणारी रस्सीखेच यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण कधी नव्हे इतके अस्थिर झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तब्बल दीड दोन वर्षापासून निवडणूका नसल्याने गावपातळीवर काम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली राजकीय अस्वस्थता महाराष्ट्रात यापूर्वी कधीच अनुभवायला आली नव्हती. ही कोंडी फोडण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाने या देशाला मार्ग दाखविण्याचे काम सातत्याने केलेले आहे. रोजगार हमी सारखी योजना असेल किंवा पंचायतराजच्या योजनेची अंमलबजावणी असेल, महिला आरक्षणाचे धोरण असेल किंवा इतर काही महत्वकांक्षी योजना, या सर्वांमध्ये महाराष्ट्र हा देशाला दिशादर्शक राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक प्रकारचा सुसंस्कृतपणा जसा होता तसाच महाराष्ट्राने राजकीय बाणेदारपणादेखील अनेकदा दाखविलेला आहे. अगदी आणिबाणीच्या काळात देखील हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील शरद पवार आणि एस.एम.व तत्कालिन इतर राजकीय नेत्यांनी बाणेदारपणे लोकशाहीच्या रक्षणासाठी भूमिका घेतली होती. मात्र आता हे सारे इतिहासजमा होते की काय असे वाटावे अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात आपण महाराष्ट्राच्या स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करणार आहोत मात्र आज त्या महाराष्ट्रात बहूतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहे. विशेष म्हणजे हा प्रशासक थोडाथोडका नव्हे तर काही ठिकाणी दोन वर्ष तर काही ठिकाणी दीड वर्षांपासून आहे. ज्या महाराष्ट्राने पंचायतराजच्या अंमलबजावणीमध्ये एक वेगळा आदर्श देशाला घालून दिला होता त्या महाराष्ट्रात आज स्थानिक निवडणूकांची परिस्थिती इतकी शोचणीय झाली आहे की आता तर स्थानिक निवडणुका होतील की नाही या बद्दलच अगदी सामान्य नागरिकांमध्ये देखील संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आदींमध्ये लोकनियुक्त सभासद नसल्याने सारे काही प्रशासकीय अधिकार्यांच्या हातात गेले आहे आणि त्यामुळे सामान्यांच्या छोट्या छोट्या कामांना मुरड घातली जात आहे. नागरी समस्या असतील किंवा ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या अडचणी, त्या सोडवायच्या कोणी? या बाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आणि एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते केवळ एकमेकांबद्दलच्या कुरबुरींमध्ये, एकमेकांवर कुरघोड्या करण्यामध्ये आणि एक दुसर्यावर आरोपांची राळ उडविण्यामध्ये व्यस्त आहेत. ज्या महाराष्ट्राने कायम एका उच्च दर्जाच्या सांसदीय राजकारणाचे आदर्श घालून दिले होते त्या महाराष्ट्रात ‘फडतूस-काडतूस’ भोवती राजकारण फिरविले जात आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये देखील जिथे कोणत्याच मुद्यांवर एकमत व्हायला तयार नाही तिथे सत्तेतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील सारे काही आलबेल नाही. जसे नाना पटोले, पवार आणि ठाकरे यांच्यातील वक्तव्ये एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे अगदी तसेच चंद्रकांत पाटलासारखे बोलभांड भाजपमध्येही आहेत. जे शिंदे सेनेला सातत्याने टोचे मारत आहेत आणि शिंदे सेनेत तर कोणी काय बोलावे याचा कोणालाच कसलाच आदमास असण्याचे काही कारणच नाही. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्राच्या देश पातळीवरील प्रतिमेवर होत आहे. एकप्रकारची अस्थिर अस्वस्थता महाराष्ट्राच्या समाजमनामध्ये भरलेली असून ती बाहेर पडण्यासाठी वाट शोधत आहे.