इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, आज म्हणजेच बुधवारी (5 एप्रिल) सोन्याने आपला नवा उच्चांक गाठला आहे. आज सराफा बाजारात सोने 1,262 रुपयांनी महाग होऊन 60,977 रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी सोन्याने 59,751 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
याशिवाय चांदीनेही 74 हजारांचा टप्पा पार केला आहे. IBJA नुसार, आज सराफा बाजारात चांदी 2,822 रुपयांनी महागली आणि 74,522 रुपयांवर पोहोचली. चांदीच्या दराची ही 31 महिन्यानंतरची उच्च पातळी आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे दर घ्या जाणून
कॅरेट किंमत (रुपये/10 ग्रॅम)
24 60,977
23 60,733
22 55,855
18 45,733
सोन्याचे दर जाऊ शकतात 65 हजारांपर्यंत
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, 2020 मध्ये सुरू झालेली गोल्ड सुपर सायकल अजूनही सुरू आहे. या वर्षी सोने 62,000 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता, परंतु सध्याच्या परिस्थिती पाहता ते 64,000 पर्यंत पोहोचू शकते.IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता सांगतात की, शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे सोन्याला आधार मिळत आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकतो.
सोन्याचा भाव 10 वर्षात दुपटीने वाढला आहे
गेल्या 10 वर्षात सोन्याने 110% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एप्रिल 2013 मध्ये सोन्याचा दर 29 हजार रुपये होता, तो आता 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 20 एप्रिल 2022 रोजी सोन्याचा भाव 51 हजार रुपये होता. म्हणजेच गेल्या 1 वर्षातच सोन्याने सुमारे 20% परतावा दिला आहे.
गेल्या 10 वर्षात सोन्याच्या भावात झाला बदल
दिनांक किंमत
5 एप्रिल 2013 29,704
5 एप्रिल 2014 28,246
5 एप्रिल 2015 26,597
5 एप्रिल 2016 28,655
5 एप्रिल 2017 28,677
5 एप्रिल 2018 30,350
5 एप्रिल 2019 31,601
5 एप्रिल 2020 43,712
5 एप्रिल 2021 45,023
5 एप्रिल 2022 51,401
5 एप्रिल 2023 60,977
रुपये प्रति 10 ग्रॅम किंमत
(स्रोत: गोल्ड प्राईज इंडिया डॉट कॉम आणि इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन)
सोन्यात मर्यादित गुंतवणूक ठरते फायदेशीर
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (वस्तू आणि चलन) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, तुम्हाला जरी सोन्यात गुंतवणूक करणे आवडत असले तरी तुम्ही त्यात मर्यादित गुंतवणूक केली पाहिजे. तज्ञांच्या मते, एकूण पोर्टफोलिओपैकी फक्त 10 ते 15% सोन्यात गुंतवणूक करावी. सोन्यात गुंतवणूक केल्याने संकटाच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता मिळू शकते. परंतू त्यामुळे दीर्घकाळात तुमच्या पोर्टफोलिओचा परतावा कमी होऊ शकतो. सोन्यात किमान 3 ते 5 वर्षे गुंतवणूक करणे अतिशय योग्य ठरते.