पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे भारतामध्ये लोकप्रिय आहेतच पण जगातील इतर देशांमध्येही त्यांची लोकप्रियता फारच आहेच. याचीच प्रचिती नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये आली. या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. कंसल्टिंग फर्म असलेल्या 'मॉर्निंग कंसल्ट'ने केलेल्या सर्वेक्षणाअंतर्गत जगभरातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची अॅप्रुव्हल लिस्ट (Approval Ratings) जारी करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त म्हणजेच 76 टक्के अॅप्रुव्हल रेटिंग मिळाली आहे. मोदी हे सर्वाधिक अंक मिळवणारे नेते ठरले आहेत. या सर्वेक्षणात जगातील 22 महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आलेला. यात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनच्या ऋषी सुनक यांच्यापेक्षाही अधिक आहे.
यादीमध्ये कोणकोणाचा समावेश?
'मॉर्निंग कंसल्ट'ने 30 मार्च रोजी जागतिक स्तरावरील नेत्यांची लोकप्रियता किती आहे हे दर्शवणारी आकडेवारी जाहीर केली. पंतप्रधान मोदींनंतर मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मॅन्युएल लोपेस ओब्रेडोर हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांना 61 टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे. काही आठवड्यांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एंथनी अल्बनीज हे 55 टक्के पसंतीसहीत तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी स्वित्झर्लंडचे एलेन बरसेट असून त्यांना 53 टक्के अॅप्रुव्हल रेटिंग मिळालं आहे. अव्वल चार नेते वगळता इतर सर्व नेत्यांना मिळालेल्या पंसतीची आकडेवारी ही 50 टक्क्यांहून कमी आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची लोकप्रियता केवळ 41 टक्के इतकी असून ते या यादीत सहाव्या स्थानी आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रड्रो हे 39 टक्के मतांसहीत सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत 7 व्या तर भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक हे 34 टक्के मतांसहीत 10 व्या क्रमांकावर आहेत.
कशी गोळा केली माहिती?
मॉर्निंग कंसल्ट या बेवसाईटने हा अहवाल रविवारी म्हणजेच 2 एप्रिल रोजी डिजीटली प्रकाशित केला. 22 ते 28 मार्च 2023 दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. रोज जगभरातील 20 हजारांहून अधिक जणांच्या ऑनलाइन मुलाखती घेऊन हा डेटा जमा करण्यात आला आहे. वेगवगेळ्या वयोगटातील लोकांचे सर्वेक्षण वेगवेगळ्या देशांमध्ये 7 दिवसांसाठी करण्यात आलं. या सर्वेक्षणात अमेरिकेतील 45 हजार तर इतर देशांमधील 500 ते 5 हजार लोकांचा समावेश होता. भारतामधून केवळ सुशिक्षित लोकांची मतं जाणून घेण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.