देशात पुढचा काळ हा निवडणुकांचा असणार आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे तर या वर्षाखेर आणखी चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील तर पुढील वर्षी याच काळात लोकसभेचे पडघम वाजलेले असतील. या निवडणूका जिंकायच्या असतील तर भाजपकडे सकारात्मक सांगण्यासारखे काहीच नाही. म्हणूनच मग भाजपचे आश्रीत असलेले किंवा कृपावंत असलेले बाबा, बुवा, साध्वी किंवा अन्य कोणी देशासमोर निरर्थक वाद वाढून ठेवत आहेत.
श्रध्दा हा प्रत्येकाचा अत्यंत खाजगी असा विषय आहे. तसेच कोणाला देव म्हणायचे हा देखील ज्याचा त्याचा विषय. देवत्वाच्या आणि संतत्वाच्या अशा काही संकल्पना असतात, नाही असे नाही, परंतु तेथेही पुन्हा व्यक्तीसापेक्षता ती येतेच. त्यामुळेच साई बाबा देव आहेत का नाहीत हा प्रश्नच मुळात गैरलागू आहे. स्वयंघोषित दैवी पुरुष बागेश्वरबाबाने म्हणूनच असला कोणता वाद निर्माण करण्याचीच आवश्यकता नव्हती, मात्र मागच्या काही काळात नसलेले वाद निर्माण करण्याची जी खुमखुमी बुवा आणि बाबांना लागली आहे, त्यात हे बागेश्वरबाबा तर अधिकच आघाडीवर आहेत.
मुळात साईबाबा या व्यक्तीरेखेभोवती अगदी काही काळापर्यंत सर्व धर्म समभावाचीच ओळख होती. खरेतर फकिरी अवस्थेत जीवन जगलेल्या साईबाबांना संतत्व दिले ते त्यांच्या भक्तांनी. त्या संतत्वाचे पुढे देवत्वात रुपांतर झाले. आज साईभक्तांची जी संख्या आहे, ती राजाश्रयाखाली दुकानदारी चालविणाऱ्या बागेश्वरधामसारख्या अनेकविध संस्थानांपेक्षा नक्कीच अधिक आहे. मात्र असे असले तरी आज साईबाबा देव आहेत का नाही असले वाद निर्माण करुन काय साधले जाणार आहे? मुळात कोणी कोणाला देव माणायचे हा खरेतर ज्याच्या त्याच्या आस्थेचा विषय, पण असल्या विषयात वाद निर्माण करुन लोकांना निरर्थक प्रश्नात अडकवून ठेवण्याचीच खेळी आहे.
एकीकडे देशाचे सर्वोच्च न्यायालय धर्म आणि राजकारणाची सांगड घालू नका असे सांगत असले तरी राजकारण्यांना म्हणा किंवा सत्तापिपासुंना म्हणा, असले वाद हवे असतातच आणि असले वाद निर्माण करणारांना पुढारी डोक्यावरही घेतात. एकदा का लोक असल्या वादात अडकले की मग महागाई, बेरोजगारी, सामाजिक न्याय, सामाजिक सुरक्षितता असल्या विषयावर कोणी प्रश्न विचारु धजावत नाही. कोणी विचारायचा प्रयत्न केला तरी असल्या निरर्थक मुद्द्यांचा कोलाहलच इतका कर्णकर्कश असतो की मग सामान्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवरचा आवाज कुठल्याकुठे दडपला जातो. आणि राजकारण्यांना हेच हवे असते. निवडणूका तोंडावर असल्यावर तर हे हमखास हवेच असते आणि म्हणूनच मग बागेश्वरबाबांसारख्या टीनपाटांचे फावत असते.
बागेश्वरधाम ही एक मानसिकता आहे. असल्या मानसिकता ठिकठिकाणी पुढाऱ्यांनी पोसलेल्या असतात आणि प्रसंगपरत्वे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचा असल्या टीनपाटांना पाठिंबा असतो. बागेश्वरधाममध्ये हजेरी लावणारे जसे शिवराजसिंह चौहान असतात तसेच कमलनाथही असतात यातच सारे काही आले.
मात्र असल्या प्रवृत्तीमुळे लोकांचे महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित होतात आणि हेच लोकशाही व्यवस्थेसाठी घातक असते याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. निरर्थक मुद्यांना बगल देत समाजकारण, राजकारणाला पुन्हा समाजकेंद्री करणे आणि भावनिकतेच्या प्रवाहातून बाजूला काढत पुन्हा विकासाच्या वळणावर आणणे ही आता समाजाचीच जबाबदारी आहे.