काही महिन्यांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता.
आता माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत महत्वाचं विधान केलंय.
एखाद्या मंदिरात भेट झाल्यास भाजप नेत्यांसमवेत फोटो काढला असेल, तर गैर नाही. सत्यजित हा अपक्ष आहे, अपक्षाला कोणताही पक्ष नसतो, त्यानं यापूर्वीही तसं ट्विट केलंय. मात्र, तो काँग्रेसमध्ये वाढलाय, त्याच्यामध्ये काँग्रेसचे विचार रुजले आहेत, त्यामुळं काँग्रेस प्रवेशासंदर्भातचा तो त्याचा निर्णय घेईल, असं सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केलंय.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार सत्यजित तांबे यांचा फोटो सोशल माध्यमांवर फिरत असतानाच आमदार थोरात यांनी यावर भाष्य केलंय. थोरातांच्या वक्तव्याला सत्यजित तांबे प्रतिसाद देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.