Advertisement

श्रीगोंद्यात दुधातून ‘विषप्रयोग’:

प्रजापत्र | Thursday, 30/03/2023
बातमी शेअर करा

श्रीगोंदा - सध्या कुणाकडे पाहुणे आले तर ‘उसाचा रस घेता की दारू..’ एवढेच विचारले जाते. चहाचे कुणी नावही काढत नाही. कारण विचारले तर सांगतात, ‘चहा पाजून आम्हाला तुमच्या आरोग्याशी खेळायचे नाही..’ काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे दूध भेसळीचे मोठे रॅकेट अन्न - औषध प्रशासन व पाेलिसांनी नुकतेच उघड केले. तेव्हापासून येथील लोकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा धसकाच घेतलाय. शहरातील एका स्वीट मार्ट चालकानेही आपल्याकडील मिठाईची विक्री निम्म्यावर आल्याचे सांगितले. व्हे पावडर व सौंदर्य प्रसाधनांत वापर होणाऱ्या लिक्विड पॅराफिनचा प्रथमच वापर करून बनावट दूध बनवले जायचे. यापैकी लिक्विड पॅराफिन हे आरोग्यास घातक, मात्र त्याचा वापर करून वर्षानुवर्षे राज्यभरातील ग्राहकांवर ‘दुधातून विषप्रयोग’ झाले. अजूनही होत असावेत असा संशय आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही श्रीगोंद्याच्या पोलिस स्टेशनमध्ये गेलो असता तिथे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनीही आम्हाला ‘थंड घेणार का?’ अशीच विचारणा केली. नगरच्या अन्न व आैषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातही असाच अनुभव आला. याचा अर्थ शासकीय यंत्रणांनीही भेसळयुक्त दुधाचा प्रचंड धसका घसका घेतला आहे. एकट्या श्रीगोंद्यात दररोज एक लाख ६० हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. आता ते अवघे ६० हजारांवर आले आहे. तब्बल १ लाख लिटर दुधाचे संकलन घटले आहे. हे सर्व दूध बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यादृष्टीने ते तपास करत आहे मात्र अन्न व औषध प्रशासन म्हणते, त्यातील काही शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने डेअऱ्यांमध्ये दूध देणे बंद केले असावे. काही लिटर दूध मात्र भेसळ आहे हे नक्की. मात्र नेमके ते किती हे एफडीएचे अधिकारी सांगू शकले नाही.

 

 

श्रीगोंद्यात चहाऐवजी उसाच्या रसाला मागणी वाढली आहे. ग्लासमध्ये मिळणारा रस आता लिटरमध्ये मिळू लागला आहे. त्यासाठी रिकाम्या बाटल्यांची व्यवस्था विक्रेत्यांनी केली आहे. पोलिस स्टेशननजीकच्या एका रस विक्रेत्याकडे गर्दी तर चहाच्या टपरीवर शुकशुकाट दिसला.

 

 

काष्टी येथील दूध भेसळ प्रकरणी पोलिसांनी २४ आरोपींविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल केला असून १० आरोपींना अटक झाली असून १४ आराेपींचा शोध सुरु आहे. एफडीएने कारवाई केल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना विलंबाने दिल्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाला व काही कागदपत्रे जाळून टाकले, मोबाईल फेकून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला. ते म्हटले भेसळ प्रकरणाचा तपास पोलिस वेगळ्याच दिशेने करताय, यावरुन शासनाच्या दोन्ही महत्त्वाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. तपासाधिकारी समीर अभंगे यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांच्या उजव्या हाताला छताला भिडतील एवढे गुटख्याचे पोते रचलेले होते. यावरुन पोलिसांचा भर गुटख्याच्या कारवाईवर असल्याचे दिसले. वास्तविक दूधात भेसळ करुन आरोग्याशी खेळ करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे मात्र तसे होतांना दिसत नाही.

 

 

अन्नात भेसळ केल्यास पूर्वी न्यायालयात खटला दाखल व्हायचा, आता मात्र केंद्राने आपल्या कायद्यात बदल केल्याने आरोपी कारागृहातून काही दिवसात बाहेर येतात. पूर्वी गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा होत होती आता फक्त काही रुपयांचा दंड होतो. कायद्यातही बदल करणे आवश्यक असल्याचे पोलिसांच्या बोलण्यातून दिसून आले.

 

 

काष्टीत कारवाई करण्यापूर्वी एक शेतकरी डेअरीत १५५ लिटर दूध देत होता, कारवाईनंतर त्याचे दूध ३ लिटरवर आले. तब्बल १५२ लिटर दूध घटले. यातून दुधात किती भेसळ होत होती, याचा पुरावा असल्याचीही चर्चा श्रीगोंद्यात होती. त्याबाबत पोलिसांना छेडले असता त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला.

 

 

असे बनवतात बनावट दूध, ज्याचा राज्यभरातील ग्राहकांना हाेताेय पुरवठा

व्हे पावडर
सुमारे ४० लिटर पाण्यात ५ किलो व्हे पावडरचे मिश्रण केले जाते.

 

लिक्विड पॅराफिन
दुधात फॅटसाठी दीड लिटर घातक लिक्विड पॅराफिन मिसळतात.

 

व्हे पावडर बाजारात सहज मिळते. त्याचा वापर बेकरी प्रॉडक्टसाठी होतो. प्रोटीन वाढीसाठीही ते वापरले जाते. मात्र त्यापासून दूध बनवणे गुन्हा. तो सर्रास केला जातो. व्हे पावडरचा वापर बनावट दुधात एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) आणण्यासाठी. छोट्या डेअरीतील मशीनही हे बनावट दूध ओळखू शकत नाही.
मिनरल ऑइलपासून बनते लिक्विड पॅराफिन. सौंदर्य प्रसाधन निर्मितीसाठी वापर. खरेदीसाठी परवाना आवश्यक. मात्र त्यापासून दूध बनवणे आरोग्यासाठी अत्यंत घातक. बनावट दुधात फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. ही भेसळसुद्धा छोट्या डेअरीतील मशीनद्वारे ओळखता येत नाही.

 

 

यातून रोज १५ लाखांची कमाई
कारवाई होण्यापूर्वी श्रीगोंदा परिसरात दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध उत्पादन व्हायचे.अन्न व औषध प्रशासनाने बनावट रॅकेट उघड केल्यानंतर हे उत्पादन ६० हजारांपर्यंत घटले.घटलेल्या १ लाख लिटरपैकी किमान ५० हजार लिटर दूध बनावट असल्याचा संशय व्यक्त.

 

 

खर्च १० रुपये, विक्री ४० रुपयांनी
एक लिटर बनावट दूध तयार करण्यासाठी प्रतिलिटर सुमारे आठ ते दहा रुपये खर्च येतो.या बनावट दुधाची बाजारात प्रतिलिटर ४० रुपये दराने सर्रास विक्री केली जात हाेती.रॅकेट चालवणारे एका लिटरमागे ३० रुपये कमाई करतात. रोज ५० हजार लिटर विक्री गृहीत धरली तरी १५ लाख रुपयांची कमाई.

Advertisement

Advertisement