मुंबई - महाराष्ट्र घर कामगार कल्याण मंडळाकडे ५५ वर्षे पूर्ण केलेली जीवित नोंद असलेल्या घरेलू पात्र कामगारांच्या बँक खात्यावर थेट (डीबीटी) १० हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
आघाडी सरकारच्या काळात २०१४-१५ साली महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या वर्षी नोंदणी झालेल्या घरेलू कामगारांच्या खात्यात १० हजार रुपये जमाही करण्यात आले. मात्र त्यानंतर सरकार बदलले. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि या निर्णयाची अंमलबजावणी तब्बल ८ वर्षे झाली नव्हती. २०१७ साली ३ लाख ८० हजार घरेलू कामगारांची नोंदणी या मंडळात होती. मात्र २०२० पासून कोरोना सुरू झाल्याने दरवर्षी करावी लागणारी ही नोंदणी होऊ शकली नाही. जुनी नोंदणी रद्द झाल्याने ७० टक्के महिला मंडळाच्या सदस्यत्वापासून वंचितच राहिल्या आहेत, त्यामुळे या सन्मान निधीचा लाभ केवळ ३० टक्के घरेलू कामगार महिलांना मिळेल, असा दावा राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ संघटनेकडून करण्यात येत आहे. या योजनेत १ लाख १४ हजार महिलांना लाभ मिळणार आहेत.