राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरच्या (Nagpur) घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकीचा फोन (Threat Call) नागपूर पोलिसांना (Nagpur Police) आला होता. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री 12 वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या घराची तपासणी केली. मात्र हा फेक कॉल असल्याचं तपासात समोर आलं आहे. दरम्यान हा खोडसाळपणा करणाऱ्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्याच्या स्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कोणतीही सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही.
दरम्यान, फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा इसम दुखावलेला होता. त्याने केवळ दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा फोन केला होता. त्याच्या कॉलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे कोणतीही वस्तू किंवा तथ्य तिथे आढळलेले नाहीत. धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नागपूर पोलिसांच्या प्राथमिक तपासात फेक कॉल असल्याचं उघड
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॉम्ब ठेवल्यचाा फोन रात्री उशिरा नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. धमकीचा फोन कॉल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. देवेद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. या पथकाने रात्री बारा ते एकच्या दरम्यान घराची तपासणी केली. त्यानंतर हा फेक कॉल असल्याचं समोर आलं. घरातील लाईट गेली म्हणून संतापून पोलिसांना कॉल करुन फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब असल्याची धमकी दिली. दरम्यान फडणवीस यांच्या निवासस्थानी नेहमीप्रमाणेच सुरक्षाव्यवस्था आहे. नेहमीप्रमाणेच इथलं कामकाज सुरु आहे. परंतु नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.