एकीकडे महागाई, इंधनदर, गॅसची दरवाढ होत असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला खर्चाची मोठी कात्री लागताना दिसत आहे. यातच आता प्रवासही महागणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर हजारो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी होत असते. याच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल दरांत मोठी वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास आणखी महागणार आहे. ०१ एप्रिल २०२३ पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. सन २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांन १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे.
यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांची वाढ
मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. याआधी ०१ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.