Advertisement

तुळशीमाळ आणि मोगरा याची तुलना कशी होणार ?

प्रजापत्र | Tuesday, 28/03/2023
बातमी शेअर करा

चर्चेतले / संजय मालाणी

युष्यात प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे असे वेगळे स्थान असते. मनुष्य स्वभावाप्रमाणे प्रत्येकाचे महत्व देखील ज्याच्या त्याच्या आयुष्यात वेगळे असते. तुळशीमाळ देवाच्या, संतांच्या गळ्यात घातली जाते तर मोगरा प्रेयसीला , अर्धांगिनीला रिझविण्यासाठी वापरला जातो. अशावेळी तुळशीमाळेने मोगरा माझ्यापेक्षा महाग कसा असे म्हणायचे नसते. महत्व जसे किमतीला असते तसे समाजातील स्थानाला देखील असते. त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी प्रबोधनकार अथवा कीर्तनकारांची गौतमी पाटीलशी केलेली तुलना सर्वथा अनाठायी वाटते.

 

महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. संतविचारांनी हा महाराष्ट्र सुपीक झालेला आहे असे जेंव्हा आम्ही म्हणतो त्यावेळी या संतांनी जे मानवतावादी विचार दिले आणि प्रसंगी कठोर शब्दात जे वास्तव मांडले त्याचे योगदान मोठे राहिलेले आहे. प्रबोधनाची गोळी नेहमीच गोड नसते, किंबहुना अनेकदा ती कडूच असते आणि म्हणूनच पचायला जड असली तरी सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी तितकीच आवश्यक असते. संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, संत तुकाराम, संत जनाबाई , गाडगेमहाराज अशी कितीतरी नावे सांगता येतील ज्यांनी आपल्या प्रबोधनाच्या कडू गोळीने समाजाला झालेला अनिष्ठ प्रथांचा आजार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात कठोरपणाने अनेकदा खुद्द ईश्वराला देखील खरमरीत भाषेत सवाल विचारणारे होते. आज अध्यात्माची जोड देऊन प्रबोधन करण्याचा तोच वारसा निवृत्ती महाराज इंदुरीकर निश्चितपणे राबवित आहेत. कीर्तनाच्या परंपरेला आक्रमक स्वरूपातील प्रबोधनाचा फॉर्म त्यांनी दिला आहे. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातील कठोर प्रहार अनेकदा प्रथमदर्शनी पचायला जड जात असले तरी ते समाजातील भीषण वास्तवाला सामोरे जाणारे, किंबहुना समाजातील वास्तव मांडून त्यातून मार्ग दाखविणारे असतात. इंदुरीकर महाराजांच्या सर्वच वक्तव्यांशी सहमत होता येत नसले तरी त्यांच्या प्रबोधनाच्या हेतूबद्दल  मात्र संशय घेण्याचे काहीच कारण नाही. याच निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी दोन दिवसापूर्वी  'तुम्हाला  तीन गाण्यांसाठी तीन लाख घेणारी गौतमी पाटील चालते, मात्र आम्ही पाच हजार वाढविले तर गहजब माजविला जातो' अशा आशयाचे विधान केले. महाराज जे बोलले ते वर उल्लेख केल्याप्रमाणे वास्तव आहेच, हे कोणीच नाकारणार नाही . मात्र याची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. गौतमी पाटील काय किंवा आणखी कोणी काय, या कलाकार आहेत. त्यांच्याकडे लोक कलाकार म्हणूनच पाहतात. त्यांच्याकडून कलेची साधना  केली जाण्याची, कलेतील नवनव्या अदाकारीची अपेक्षा केली जाते. आणि लोक किंमत करतात किंवा पैसे मोजतात ते त्यांच्या अदाकारीला. या कलाकार घरी येणार म्हणून काही कोणी रांगोळीने घर सजवत नाही, किंवा पाटाभोवती अगरबत्त्या लावून त्यांचे स्वागत होत नाही. त्यांचे पाय स्वतःच्या हाताने धुण्याचे मोठेपण कोणी दाखवित नाही. कीर्तनकारांच्या आयुष्यात हा जो सन्मानाचा, स्वागताचा, मोठेपणाचा भाग येतो तो कलाकारांच्या बाबतीत नसतो. त्यामुळे कलाकार आणि प्रबोधनकार किंवा कीर्तनकार यांची तुलना करणेच मुळात अनाठायी आहे. जे दोन प्रांत वेगळे आहेत त्याची तुलना एकाच मापात होणार तरी कशी ? तुळशीमाळ आणि मोगरा याला एकाच मापात मोजता येत नसते आणि मोजायचेही नसते . तुळशीमाळेचा सुवास मंदिराच्या गाभाऱ्यात आवश्यक असतो, मोगऱ्याचा सुवास वेगळ्या ठिकाणी असतो. त्यामुळे तुळशीमाळेने मला मोगऱ्याची किंमत आली नाही असे म्हणायचे नसते.

आणखी महत्वाचे म्हणजे इंदुरीकर महाराज काय किंवा आणखी कोणतेही कीर्तनकार, प्रबोधनकार काय, त्यांना एक वेगळा वारसा आहे. तो वारसा संत विचारांचा आहे. लोक त्यांना त्यांचे वैचारिक वारसदार म्हणूनच पाहतात. आज महाराष्ट्रात कोणत्याही कीर्तनकाराला ज्ञानोबा, तुकोबांच्या विचारांचे वाहक म्हणून पहिले जात असेल  तर त्यांच्या विचारांवर चालण्याची जबाबदारी अर्थातच कीर्तनकारांची असते.

 

'जेथे कीर्तन करावे, 

तेथे अन्न न सेवावे, 

बुक्का लावू नये भाळी, 

माळ घालू नये गळा,

तट्टा वृषभासी दाणा,

तृण मागो नये जाणा,

तुका म्हणे द्रव्य घेती,

देती ते ही नरका जाती '

 

 

हा जो वारसा म्हणा, विचार म्हणा किंवा संस्कार म्हणा तो कीर्तनकार, प्रबोधनकारांचा आहे. जनमानसातील मोठेपणासोबतच हा संस्कार येत असतो. आणि म्हणून तो पाळायचं असतो,  हा संस्कार गौतमी पाटील काय किंवा कोणत्याही कलाकारासाठी नक्कीच नाही. त्यामुळे गौतमी पाटील किती गाण्यांचे किती घेते याची तुलना कीर्तनकारांच्या मानधनाशी कशी होणार ?

Advertisement

Advertisement