सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला येत्या 4 दिवसात सुरू होणार आहे. त्याआधी डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलाय. तो केकेआर संघाचा कर्णधार आहे. आता तो दुखापतीमुळे खेळत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. टीम इंडियासाठी केवळ 3 सामने खेळलेल्या खेळाडूवर ही मोठी जबाबदारी देण्यात आल्याने अनेकांनी डोळे बारीक केले आहेत.
KKR चा नवा कॅप्टन कोण?
दिल्लीचा डावखुरा फलंदाज नितीश राणा यंदाच्या मोसमात केकेआरचं नेतृत्व करणार आहे. राणा जखमी कॅप्टन श्रेयस अय्यरची जागा घेईल. नितीश यांच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे हे आमचे भाग्य आहे. त्यामुळे श्रेयसच्या अनुपस्थितीत नितिश टीमचं नेतृत्व करेल, असं केकेआरच्या निवेदनात म्हटलं आहे.
श्रेयस अय्यर लवकरच बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. नितीश व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये आपल्या राज्याचं नेतृत्व करतोय आणि 2018 पासून कोलकाता नाईट रायडर्ससोबत आहे, त्यामुळे तो चांगलं काम करेल, अशी आशा टीमने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि सपोर्ट स्टाफच्या नेतृत्वाखाली नितीशला मैदानाबाहेर सर्व आवश्यक सहकार्य मिळेल आणि संघातील अनुभवी खेळाडूंचाही त्याला पाठिंबा असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर नितीशला कॅप्टन्सीबद्दल शुभेच्छा देखील दिल्यात. तर श्रेयसला लवकर बरे होण्यासाठी टीमकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.