Advertisement

चार दिवस चार वेळा चार इंजेक्शन

प्रजापत्र | Monday, 27/03/2023
बातमी शेअर करा

जळगावमधून (Jalgaon) एका धक्कादायक बातमी समोर आली असून तुम्ही जर बाळास अधिकृत डॉक्टरांकडे (Doctor) घेऊन जात नसाल तर सावधान, जळगाव मध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीड वर्षीय बालकांचा दुर्दैवी मृत्यू (Child Death) झाल्याची घटना घडली आहे. संबंधित तीन डॉक्टरांच्या विरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. 

 

 

जळगाव तालुक्यातील पाथरी येथील दुर्वेश नाना पाथरवट या बालकाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी चार दिवसात कमरेवर चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन (Injection) दिले. या इंजेक्शनमुळे बालकाच्या कमरेवर सेफ्टिक होऊन कमरेपासून ते मांडीपर्यंत गँगरीन (Gangrene) झाले होते. त्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी दीड वर्षांच्या बालकाच्या आईच्या फिर्यादीवरून पाथरी गावातील डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज गंगाराम उर्फ जयराम पाटील आणि डॉ. सुभाष जाधव या डॉक्टरांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

धरणगाव तालुक्यातील वाघळुद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. 10 ऑक्टोबर 2021 रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबियांनी त्यास पाथरी गावातीलच डॉ. स्वप्निल पाटील यांच्या दवाखान्यात नेले होते. त्यांनी तपासून दुर्वेश यास कमरेवर एक इंजेक्शन व काही गोळ्या लिहून दिल्या. तीन दिवसांनी पुन्हा ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला पुन्हा दवाखान्यात नेले. याठिकाणी डॉ. स्वप्निल पाटील नव्हते, तर डॉ. युवराज पाटील यांनी दुर्वेश यांच्या दोन्ही कमरेवर इंजेक्शन देऊन गोळ्या लिहून दिल्या होत्या. दरम्यान, 14 ऑक्टोबरला दुर्वेशच्या कमरेवर इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी त्रास व्हायला लागल्याने कुटुंबियांनी डॉ. युवराज पाटील यांना संपर्क साधला पण, संपर्क झाला नाही, म्हणून त्यांनी गावातीलच डॉ. सुभाष जाधव यांच्याकडे त्याला नेले. त्यांनी सुध्दा दुर्वेशला कमरेवर व हाताच्या दंडावर इंजेक्शन दिले व पुन्हा काही गोळ्या लिहून दिल्या होत्या. मात्र कोणताही फरक न होता उलट त्रास वाढतच असल्याने उपचाराला जळगावात पाठविले आणि बालकाला गँगरीन झाल्याचे समोर आले होते. 

 

 

दरम्यान, दुर्वेशला कमरेवर इंजेक्शन घेतल्याच्या ठिकाणी त्रास होत असल्याने त्याच्या मामाने डॉ. युवराज पाटील यांना सांगितले. डॉक्टरांनी त्याला घरी येऊन तपासले. पुन्हा दवाखान्यात डॉ. स्वप्नील पाटील यांनी त्यास तपासून इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी सेप्टिक झाले असावे, असे सांगत त्यास पुढील उपचारासाठी जळगावातील खासगी रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. 15 ऑक्टोंबर रोजी त्याला खासगी रूग्णालयात तपासल्यावर कमरेपासून ते मांडीपर्यंत गँगरीन झाले असून त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. दुर्वेशच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला. पण, शस्त्रक्रियेपूर्वी रक्ताचे सॅम्पल घेत असताना दुर्वेशची हालचाल अचानक थांबली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

 

तिन्ही डॉक्टरांविरूध्द गुन्हा दाखल...
या प्रकरणात दुर्वेश याचे सॅम्पल तपासणीसाठी नाशिक येथील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळा येथे पाठविण्यात आले होते. तर अकस्मात मृत्यूचे चौकशीचे पत्र हे अभिप्रायासाठी वैद्यकीय अधीक्षकांकडे सुध्दा पाठविण्यात आले होते. नुकताच त्यांच्याकडील अभिप्राय अहवाल प्राप्त झाला असून त्यात डॉ.स्वप्निल युवराज पाटील, युवराज गंगाराम ऊर्फ जयराम पाटील व डॉ सुभाष जाधव यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नाही. तरी त्यांनी इंजेक्शन दिले. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनच्या ठिकाणी गँगरीन होऊन मृत्यू आलेला आहे, असे नमूद आहे. त्यामुळे अखेर दीड वर्षानंतर गुरूवारी दुर्वेश याच्या आई प्रतिभा पाथरवट यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुर्वेश याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिन्ही डॉक्टरांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement