मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं. विधानभवनाच्या गेटपासून पायऱ्यांपर्यंत हे दोन्ही नेते एकत्रित संवाद करत येताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यामुळे भविष्यात ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र दिसू शकतात अशी राजकीय चर्चा सुरू झाली. त्यात मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारल्यामुळे या चर्चेला आणखी वाव मिळाला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, मला लोकसभेच्या लॉबीत अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना भेटतात. रस्ता एकच असतो. विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो. अद्यापतरी देशात सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगवेगळे रस्ते तयार झाले नाहीत. ज्यांना हवे असेल ते करू शकतात. त्यामुळे फडणवीस-ठाकरे भेट हा विषय नाही असं त्यांनी सांगितले. तसेच विधानभवनात जाताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्रित पुढे आले, संवाद करत विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत गेले याचा अर्थ ते एकत्र येतील असं नाही. फडणवीस आणि ठाकरेंच्या वाटा अजिबात एकत्र येणार नाहीत, हे मी सांगतोय असं सांगत ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. फडणवीस-ठाकरे भेटीचीच चर्चा, काय घडलं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. ठाकरे गटाचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव ठाकरे. दोघांनी स्मित हास्य केले. नमस्कार झाला आणि त्यांनी बोलत बोलत विधानभवनात एन्ट्री केली. आठ महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये साधी भेटही होऊ शकली नव्हती. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या भेटीत सहजता होती. कटूतेचा लवलेशही नव्हता. दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. पूर्वी खुलेपणा होता. पण, हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते, असं म्हटलं.
बातमी शेअर करा