आज मराठी नववर्ष दिन. 'प्रजापत्र ' आज आपला दहावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. दहावर्षापूर्वी माध्यमांच्या विश्वात 'प्रजापत्र 'ने सकारात्मक पत्रकारितेची गुढी उभारण्याचा संकल्प करून पाऊल ठेवले आणि आज ही वाटचाल दहा वर्षांची झाली. 'चळवळीला वाहिलेले दैनिक ' म्हणून आम्ही टाकलेले पहिले पाऊल , 'एक प्रगत दैनिक ' या वळणावर आलेले आहे. बदल हा जगाचा नियम आहे , त्यानुसार 'प्रजापत्र 'ने देखील स्वतःमध्ये अनेक बदल केले , अर्थात ते बदल होते बाह्यरूपाचे. 'प्रजापत्र'ने आपली भूमिका मात्र कधी बदलली नाही. खरेतर भूमिका घेऊन बातमीदारी करणे आजच्या माध्यमांसमोर मोठे आव्हान आहे, मात्र 'प्रजापत्र 'ला ते आव्हान पेलता आले, ते आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या , सुज्ञ जाहिरातदारांच्या आणि हितचिंतकांच्या बळावर.
एखाद्या दैनिकाची तशी दहा वर्षाची वाटचाल फार मोठी नसली, तरी या दहा वर्षात आलेली आव्हाने फार मोठी होती. बीड जिल्ह्यात सुरुवातीला पडलेला दुष्काळ असेल किंवा नंतर आलेले कोरोनाचे संकट, या संकटांनी साऱ्या अर्थव्यवस्थेसमोरच मोठे आव्हान निर्माण केले होते , त्याचा सामना 'प्रजापत्र 'ला देखील करावा लागला. त्यातच माध्यमांचे स्वरूप बदलत गेले. देशातील राजकीय परिस्थिती बदलत गेली. शासनाची लघु वर्तनपत्रांबाबतची धोरणे बदलत गेली, अशा सर्व परिस्थितीत टिकून राहणे सोपे नव्हते, पण आमचा वाचकांवर आणि 'प्रजापत्र 'वर प्रेम करणाऱ्या सर्वांवर असलेला विश्वास आम्हाला या सर्व काळात पाय रोवून उभे राहण्याचे बळ देऊन गेला. त्यामुळे या दहा वर्षांच्या वाटचालीचे सारे श्रेय अर्थातच वाचक, हितचिंतक , जाहिरातदार , वाचकांच्या घरापर्यंत रोज अंक पोहचविणारे वर्तमानपत्र वितरक आणि दैनिकात एक कुटुंब म्हणून काम करणारे या दहा वर्षातील 'प्रजापत्र 'चे सारे कर्मचारी यांचे आहे.
मागच्या दहा वर्षात 'प्रजापत्र 'ने आपला विस्तार बीडसह लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही केला. जगाची पावले ओळखून डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'प्रजापत्र 'ने आपली विश्वासार्हता टिकवून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बातमीची विश्वासार्हता , बातमीच्या माध्यमातूनसामान्यांच्या व्यथांना स्थान देतानाच उपेक्षितांच्या आवाज होण्याचा प्रयत्न 'प्रजापत्र 'ने केला . अनेक विषयात 'प्रजापत्र 'ने मांडलेली भूमिका समाजाची भूमिका झाली. कसोटीच्या क्षणी 'नाहीरे ' वर्गाच्या मागे उभे राहण्यासोबतच , ज्यावेळी संवैधानिक स्वातंत्र्यांचा विषय आला त्यावेळी 'सत्य असत्या मन केले ग्वाही , मानिले नाही बहुमता ' हा संत तुकाराम महाराजांचा विचार घेऊन आम्हाला वाटचाल करता आली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज माध्यमांमधील गळेकापू स्पर्धेत आणि टिकण्याच्या संघर्षातही 'प्रजापत्र ' कधी प्रवाहपतित झाला नाही, प्रसंगी प्रवाहाच्या विरोधात जाऊन देखील समाजाला पोषक वाटतो तो विचार देण्याचे काम आम्हाला करता आले. शेतकरी, कष्टकरी , सामान्य माणूस यांच्या प्रश्नांच्या बाबतीत कधीच तडजोड करायची नाही , हे ब्रीद 'प्रजापत्र 'ने कायम जपले , आमच्यात ते बळ आले ते अर्थातच वाचकांच्या पाठबळामुळे.
आज माध्यमांचे चित्र अधिकच बदलत चालले आहे. अभिव्यक्तीची गळचेपी करण्याचे वातावरण देशभर आहे. अशावेळी सामान्यांनाचा आवाज होण्याची गरज अधिक प्रकर्षाने समोर येत आहे. ट्रोल नावाची विकृती समाजामध्ये विषवल्लीप्रमाणे फोफावत आहे. फेकन्यूजच्या माध्यमातून समाजासमोर वेगळी गृहीतके निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि त्याचवेळी समाजाच्या हाती अनेक पर्यायी माध्यमे आली आहेत. ज्या कोणाला मुख्य प्रवाहातील माध्यमे आपली दखल घेत नाहीत असे वाटते सोशल मीडिया आलेला आहे, अशा वातावरणातून आता सर्वच माध्यमांना प्रवास करावा लागणार आहे. 'प्रजापत्र 'ला देखील ते आव्हान पेलावे लागणार आहे. सकारात्मक बातमीदारीची , समस्यांना उत्तरे देण्याची , व्यथा मांडतानाच समाधान शोधण्याच्या प्रयत्नांची जी गुढी 'प्रजापत्र 'ने दहा वर्षांपूर्वी उभारली, ती अशीच फडकती ठेवण्याचे आणि खऱ्या अर्थाने प्रजेचा चेहरा होण्याचे आव्हान आपण सर्वांच्या पाठबळावर 'प्रजापत्र ' भविष्यातही पेलेल इतकाच विश्वास या निमित्त्ताने आपणा सर्वांना देत आहोत. आज 'प्रजापत्र 'च्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी यावे , आणि आमच्यामागे शुभेच्छांचे पाठबळ उभे करावे ही विनंती आहेच.
सुनील क्षीरसागर
संपादक