Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - विकृत मानसिकता

प्रजापत्र | Monday, 27/02/2023
बातमी शेअर करा

एखाद्या व्यक्तीचं खाजगी जीवन चोरून चित्रित करणे आणि ते समाजमाध्यमांसमोर प्रसारित करणे हे कोणत्याच संस्कृतीत, संस्कारात बसणारे नाही. गौतमी पाटील हिच्या अदाकारीबद्दल अनेकांचे मतभेद असू शकतात, ते असायला हरकत नाही. पण याचा अर्थ तिच्या खाजगी आयुष्यात घुसून तिचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ लोकांसमोर आणणे हे मानसिक विकलांगतेचे लक्षण आहे. बहूजन समाजातील एका नवोदित कलाकाराला नामोहरम करण्यासाठी हा तिच्या चारित्र्यावर केला गेलेला हल्ला आहे. हा विषय केवळ गौतमी पाटीलचा नाही. तर बहूजन समाजातून येणार्‍या कलाकारांप्रती एका विशिष्ट वर्गात मानसिकता नेमकी काय आहे हे ध्वनित करणारा आहे.

 

कला क्षेत्रावर कायम आपलेच वर्चस्व राहिले पाहिजे अशी मनुवादी मानसिकता जपणार्‍या लोकांची संख्या कमी नाही. याच मानसिकतेतून स्वत:ला प्रस्थापित म्हणविणार्‍या कलाकारांनी नवोदित बहूजन कलाकारांना कायम हतोत्साहित करण्याचे काम केले आहे. लता मंगेशकर यांच्यापासून अनेकांची उदाहरणे या बाबतीत देता येतील. सध्या गौतमी पाटीलच्या संदर्भाने जे काही वादळ उठले आहे. तो देखील बहूजन प्रतिकांना सपंविण्याच्या मोहिमेचाच एक भाग आहे.
गौतमी पाटीलच्या अदाकारीला लोककला म्हणावे का? ती लावणी आहे का? हा केवळ अश्‍लिलतेचा प्रकार आहे का? अशा अनेक प्रश्‍नांवर प्रत्येकाची मते निश्‍चितपणे वेगळी येतील हे वेगळे सांगायला नको. पण या प्रत्येक विषयावर मतमतांतरे असली तरी गौतमी पाटीलने या कला क्षेत्राला एक धक्का दिला आहे. संगीत, नृत्य ही आमचीच मिरासदारी आहे. असे समजणार्‍या वर्गाला गौतमी पाटीलने दिलेला धक्का पचण्याच्या पलिकडचा आहे. त्यावेळी एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेच्या बाबतीत नामोहरम करता येत नाही, किंवा त्याच्या कलेची स्पर्धा करता येत नाही. त्यावेळी त्या कलाकाराचे चारित्र्य हणन करण्याची वर्चस्ववादी मानसिकता समाजात रुढ झालेली आहे. किंबहूना त्यांच्या हाती व्यवस्थेची सूत्रे आहेत त्यांनी हीच मानसिकता रुढ केलेली आहे.मध्यंतरी एका रस्त्यावरच्या गायिकेने सुरेल आवाजात गायन केल्यानंतर दिवंगत लता मंगेशकर यांनी जो उपहास व्यक्त केला होता.त्यातूनच त्या व्यवस्थेची मानसिकता सहज लक्षात येऊ शकते. आज गौतमी पाटील या कलाकाराचे खाजगी व्हिडिओ जे लोक व्हायरल करत आहेत. ते या निच मानसिकतेचे वाहक आहेत.
गौतमी पाटीलवर तिच्या कलेच्या अनुषंगाने, तिच्या अदाकारीच्या अनुषंगाने जे काही आक्षेप आहेत. त्याबद्दल आम्हाला भाष्य करायचे नाही. शेवटी अश्‍लिलता, नग्नता ही पाहणार्‍याच्या संस्कारावर अवलंबून असते. एका तृषार्त बालकाला स्तनपान देणार्‍या मातेमध्ये देखील अश्‍लिलता शोधणारे लोक असतातच ते मुळातच अंबटशौकीन असतात. त्यांना कोठेही अश्‍लिलता दिसते. त्यामुळे गौतमी पाटीलच्या अदाकारीकडे अश्‍लिलता म्हणून पाहणारे महाभाग असतीलही. आपल्या या अदाकारीतून अश्‍लिलता प्रदर्शित झाली असेल तर माफी मागण्याचा मोठेपणा देखील गौतमी पाटीलने दाखविलेला आहे. पण इतके झाल्यानंतर तिचा खाजगी व्हिडिओ प्रदर्शित होत असेल तर ही एका बहुजन कालाकाराला संपविण्याची मानसिकता आहे. याच भावनेतून याकडे पहावे लागेल.
जो महाराष्ट्र आपण छत्रपती शिवरायांचा, राष्ट्रमाता जिजाऊंचा आहे असे म्हणतो त्या महाराष्ट्रात आपण एका बहुजन महिला कलाकाराचा सन्मान करु शकत नसू किंबहूना तिच्या खाजगी आयुष्यात डोकावून तिला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करणार असू तर शिवबांचे, जिजाऊंचे विचार आपल्यापर्यंत किती पोहचले आहेत हा मोठा प्रश्‍न आहे आणि याचे उत्तर समाजाला द्यावे लागेल. 

 

Advertisement

Advertisement