कोल्हापूरच्या कण्हेरी माठातील तब्बल ५२ गाईंच्या मृत्यूची घटना कोणाच्याही काळजाला चटका लावून जाणारी आहे. या गाईंचा मृत्यू काही कत्तलखान्यात झालेला नाही , तर ज्या लोकोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले , त्या कार्यक्रमात ही घटना घडली आहे. गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्यामुळे विषबाधा झाली आणि त्यातून हे सारे ओढवले आहे. मानवी निष्काळजीपणा अश्राप जीवांच्या मृत्यूला कसा कारणीभूत ठरू शकतो हेच या घटनेतून समोर आले आहे. मात्र इतक्या मोठ्या घटनेवर देशातील कोणतेच गोरक्षक काहीच बोलायला तयार नाहीत. इतरवेळी पंजाब, गुजरातेतून शेतकऱ्यांनी जनावरे आणली तर ती वाहने देखील ठिकठिकाणी अडविणारे कथित गोरक्षकांचे तांडे आता मात्र गायब झाले आहेत . कण्हेरी माठातील घटनेचे भांडवल व्हावे असे मुळीच नाही. शिळे अन्न का दिले गेले, याची चौकशी व्हायला हवी, मात्र जो विवेक कण्हेरीसाठी लावला जाईल , तोच विवेक इतर प्रत्येक ठिकाणी देखील लावला जावा इतकीच अपेक्षा आहे.
गाईचे कृषी संस्कृतीमधले महत्व वादातीत आहे. त्यामुळे सरसकट गोहत्या कृषिसंस्कृती असलेल्या देशात किंवा जेथील अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे तेथे समर्थनीय कधीच नव्हती. महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेमध्ये गाईला असलेले महत्व किंवा सावरकरांनी गाईचे केलेले विवेचन लक्षात घेतले तरी गवणष संवर्धनाचे महत्व समजू शकते. मात्र या कृषिसंस्कृतीच्या तत्वज्ञानाचा कसलाही विचार न करता मागच्या काही काळात देशात ठिकठिकाणी कथित गोरक्षकांच्या उपद्व्यापामुळे शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत. गोवंशाचीच काय, कोणत्याही पशुची अवैध तस्करी होत असेल तर ती रोखलीच पाहिजे, त्यासाठी प्राणी संरक्षण अधिनियम अस्तित्वात आहेत, त्याअंतर्गत संरक्षण अधिकारी आहेत , मात्र या सर्वांचे अधिकार आपल्या हातात घेऊन आपणच जणू गोवंशाचे तारणहार आहोत असे समजणाऱ्या टोळ्या देशात अनेक ठिकाणी समोर आलेल्या आहेत. मात्र आता यापैकी कोणीच कण्हेरी मठात जे काही घडले त्याबद्दल बोलायला तयार नाहीत.
खरेतर जिथे मानवी संस्कृतीच्या विकासाचा विषय असतो, तिथे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाणे अपेक्षितच नाही. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला जातीच्या आणि धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची सवय लागलेली आहे. एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचा कर्ता कोण आहे, त्याची जात किंवा धर्म कोणता आहे, त्यावरून त्या क्रियेबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची असे ठरविण्याची पद्धत पडली आहे. त्यामुळेच एकच कृती एकाने केली तर त्याज्य आणि दुसऱ्याने केली तर स्वीकारार्ह , किमानपक्षी दुर्लक्ष करण्यासारखी अशी जगरीत झाली आहे.
खरेतर कण्हेरी मठात जे काही घडले , तेथेही त्या गाईंचा मृत्यू व्हावा अशी कोणाची इच्छा किंवा हेतू असेल असे नाहीच. कोणत्याही सह्रदय व्यक्तीला असे काही व्हावे असे वाटणार नाहीच. पण ज्या ठिकाणी लोकोत्सव म्हणा किंवा आणखी कोणते उत्सव होतात , प्रदर्शने होतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून पशु आणले जातात , त्यांच्या सुरक्षेचे काय ? याचा विचार केलाच जात नाही. केवळ कण्हेरी मठात असे घडले असे नाही. अनेक ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये होणारी पशूंची आबाळ खरतर सर्वांच्या चिंतेचा विषय असायला हवा, पण त्याबद्दल कोणी बोलत नाही. आज लम्पिमुळे अनेक ठिकाणचे बाजार अजूनही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. लमपीने ज्या जनावरांचे बळी घेतले त्यात गाई देखील होत्या, त्याबद्दल गोसंवर्धनाला वाहून घेतलेले तर सोडाच पण काहींत गोरक्षक देखील बोलत नाहीत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणचे जनावरांचे बाजार बंद आहेत, म्हणून येथील शेतकरी पंजाब, हरियाणा , गुजरात येथून पशुधन आणू पाहत आहे, मात्र ते पशुधन त्याच्या गावात येईपर्यंत त्याच्या जीवात जीव नसतो, रस्त्यात अनेक ठिकाणी कथित गोरक्षक त्यांची वाहने अडवितात आणि त्या प्रत्येकाचे 'समाधान ' करताना शेतकऱ्यांचाही नाकी नऊ येतात , त्याबद्दल बोलण्याचे कोणी धारिष्ट्य करीत नाही, हे चिंतनीय आहे. यावर विचार व्हायला हवा. कण्हेरी माठातील घटनेचे भांडवल व्हावे असे मुळीच नाही. शिळे अन्न का दिले गेले, याची चौकशी व्हाल हवी, मात्र जो विवेक कण्हेरीसाठी लावला जाईल , तोच विवेक इतर प्रत्येक ठिकाणी देखील लावला जावा इतकीच अपेक्षा आहे.