Advertisement

केज तालुक्यात बालविवाह

प्रजापत्र | Friday, 24/02/2023
बातमी शेअर करा

केज :- दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छे विरुद्ध लग्न लावून दिले. तिने हे लग्न मान्य नाही व नांदणार नाही. असे म्हणताच वडील, आजोबा आणि मामाने तिला एका गाडीत बसवून अज्ञात स्थळी सोडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीचे आई वडील, आजोबा, मामा, सासू सासरे आणि नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अंबाजोगाई तालुक्यातील एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या इच्छे विरुद्ध दि. १६ फेब्रुवारी रोजी तिच्या मामाच्या गावी मांगवडगाव ता. केज येथील शेतात औरंगाबाद येथील एका तरुणासोबत लावून दिला. सदर अल्पवयीन मुलगी ही त्या विवाहास तयार नसताना बळजबरीने व धमकी देऊन तिचा विवाह लावून देण्यात आला. त्या नंतर सासू-सासरे आणि नवऱ्या सोबत एका गाडीने घेऊन ते औरंगाबादला घेऊन गेले. औरंगाबादला गेल्यास त्या रात्री अल्पवयीन मुलीने तिला हे लग्न मान्य नसल्याने इथे राहणार नाही, असे सांगीतले. तेव्हा तिला सासरच्या मंडळींनी धमकावले तसेच तिच्या आई-वडिलांना फोन केला आणि हा प्रकार सांगितला.

 

त्या नंतर दि. १८ फेब्रुवारी रोजी मुलीचे वडील, आजोबा आणि मामा है स्कॉर्पिओ गाडीने औरंगाबादला गेले. तिथे तिला सर्वांनी मारहाण केली. तिला त्यांच्या सोबत स्कॉर्पिओ गाडीत बसवून एका अज्ञात स्थळी नेऊन सोडून दिले आणि ते सर्व निघून गेले. त्या अल्पवयीन मुलीने एका महिलेला तिची व्यथा सांगितल्या नंतर ती महिला व एक पुरुष यांच्या मदतीने तिने दौलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वा. आई-वडील, आजोबा, मामा, सासू-सासरे, व नवरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा हा युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत मांगवडगाव येथील असल्याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे है पुढील तपास करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement