विचारधारा कोणतीही असली तरी त्या विचारधारेतील मानवता आणि सामाजिकता अंगात भिनली की काय होतं आणि कसे बदल घडविता येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुदाम भोंडवे होते. नानाजी देशमुखांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या व्यक्तीने डोमरीसारख्या माळरानावर मुल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्था रुजवित कितीतरी पिढ्या घडविल्या आहेत. तीन हजारांहून अधिक विद्यार्थी सुदाम भोंडवेंच्या संस्कारातून शब्दश: घडले आहेत. समाजाच आपण देणं लागतो आणि ते सातत्याने दिले पाहिजे याच भावनेने प्रेरित झालेल्या आणि झपाटल्यागत काम करणार्या या व्यक्तीची अचानक झालेली एक्झिट हे खर्या अर्थाने समाजाचे नुकसान आहे. माळरानावर शिक्षणाचा मळा फुलविणारा रचनाकार पाठीमागे खूप मोठी पोकळी ठेवून गेला आहे.
विचारधारा डावी असो किंवा उजवी किंवा आणखी कोणती, कोणत्याही विचारधारेतून आपण काय घेतो याला महत्त्व असते. कोणत्याही विचारधारेतील सामाजिकता आणि सामाजिक दायित्व हे जर आपल्या जगण्याचे अंग बनले तर मग व्यक्ती एखाद्या कामात झोकून देतो आणि अशा झोकून देणार्या हाताच्या माध्यमातूनच काहीतरी उभे राहत असते. सुदाम भोंडवे हे असेच समाजासाठी स्वत:ला झोकून दिलेले व्यक्तिमत्त्व.
नानाजी देशमुख यांच्या विचारधारेने प्रेरित झालेल्या सुदाम भोंडवे यांनी डोमरीसारख्या माळरानावर शिक्षणाचे जे नवेनवे प्रयोग केले आणि त्यातून आजपर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थी घडविले हे खरे तर शिक्षण क्षेत्रातील एक मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. आज, आजच काय अगदी मागच्या पाच सहा दशकात शिक्षण संस्था उभारणे म्हणजे शासनाकडून, समाजाकडून काही तरी घेणे असा पायंडाच पडलेल्या समाजव्यवस्थेत एखादा व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन, ऊसतोड कामगार, कष्टकर्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून देतो हे उदाहरण आजकाल विरळ होत चालले आहे. ‘राष्ट्राय स्व:, इदंन मम’ हे बौद्धिकात सांगणे सोपे असते परंतु खर्या अर्थाने राष्ट्रकार्यासाठी, समाजकार्यासाठी स्वत:ला झोकून देणे वाटते तितके सोपे नसते, त्यासाठी मनाची तितकीच मोठी खंबीरता लागते. ती खंबीरता सुदाम भोंडवे यांच्या रोजच्या जगण्याचा खर्या अर्थाने भाग झाली होती. संघ परिवाराच्या परिघात वाढलेले सुदाम भोंडवे विचारांनी मात्र अधिकाधिक व्यापक असल्याचे अनेकदा दिसून आले. एखाद्या विचारधारेत वावरताना आपली विचारधारा हेच काय ते अंतिम सत्य अशा प्रकारची कट्टरता आणि कर्मठता अनेकांमध्ये येते. आज समाजव्यवस्थेत हे सर्रास पाहायला मिळत असण्याच्या कालखंडात स्वत:च्या विचारधारेवर ठाम असतांनाही इतर सर्व विचारधारांना समजून घेणे, ऐकून घेण्याची मानसिकता सुदाम भोंडवे यांनी स्वत:मध्ये विकसित केली होती आणि त्यातूनच ते अधिकाधिक प्रगल्भ होत गेले असावेत.
डोमरीसारख्या माळरानावर मुल्याधिष्ठीत शिक्षणाचा प्रयोग करणे सोपे नव्हते. त्या मागे अक्षरश: अडचणींचे डोंगर उभे होते. बहुजन समाजातून आलेल्या या व्यक्तीने कधी अडचणींचा बावू केला नाही. संघाच्या प्रार्थनेत व्यक्त झालेला ‘स्वत: निवडलेला काटेरी मार्ग’ हा भाव सुदाम भोंडवे यांनी स्वत:च्या जगण्याचा मंत्र केला होता. त्यामुळेच या माळरानावर गुरूकुल पद्धतीने शिक्षण देणारी एक व्यवस्था केवळ उभी राहिली नाही तर 37 वर्षात ही व्यवस्था म्हणजे एक वेगळी ओळख निर्माण करणारी ठरली. डोमरीच्या गुरूकुलात प्रवेशासाठी पालकांच्या रांगा आजही लागलेल्या असतात. हे वेगळेपण निर्माण करणे वाटते तितके सोपे नसते पण त्या मागे सुदाम भोंडवे आणि त्यानंतर त्यांच्या पुर्ण कुटुंबाचेच मोठे योगदान होते. एखादी गोष्ट उभी केल्यानंतर ती सोडण्याची वेळ येत असेल तर अनेकजण मोठा कल्लोळ माजवतात. पण आपण उभे केलेल्या संस्थेतून बाहेर पडण्याची वेळ येणार असेल तर तितक्याच निरीच्छपणे अलगद त्यातून बाहेर पडण्याची तयारी देखील सुदाम भोंडवेंनी दाखविली होती हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच सुदाम भोंडवे हे व्यक्तिमत्त्व खर्या अर्थाने सामाजिक वर्तुळातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व ठरतं. अशा सुदाम भोंडवेंचं अकाली जाणं आणि त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी, सून आणि नातीचाही मृत्यु होणं म्हणजे काळानं माणुसकीवर उगविलेला सूड असंच म्हणावं लागेल. आज सुदाम भोंडवेंच्या जाण्यानं केवळ डोमरीचं गुरूकुल हळहळत नाही, त्यांनी घडविलेले तीन हजाराहून अधिक विद्यार्थीच हळहळत नाहीत तर सामाजिक क्षेत्रात काही तरी परिवर्तन झाले पाहिजे असे वाटणार्या आणि सामाजिक दायित्व, समाजासाठी झोकून देणे आणि नवनिर्मितीची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला ही दुःखद घटना चटका लावून गेली आहे. सामाजिक कार्यात ध्येय निष्ठा ठेवून वाटचाल करणार्या व्यक्ती कमी होत असणार्या काळात तर सुदाम भोंडवे यांचं जाणं, एका रचनाकाराचं जाणं म्हणजेच वेदनादायी आहे.