रस्त्यावरून सायकल चालविताना एक व्यक्ती पडला, पण आपल्याला लोक हसत आहेत असे लक्षात येताच, 'अहो मी कुठे पडलोय , ही तर माझी पद्धत आहे उतरण्याची ' अशी फुशारकी त्याने मारल्यावर सामान्यांना जे वाटेल तेच आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल यांनी राजभवनातून बाहेर पडत दिलेल्या मुलाखतींवरून वाटत आहे. राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांचा विषय असेल किंवा पहाटेच्या शपथविधीचा, या विषयावर खरेतर राज्यपालांनी आता काहीच बोलण्याची आवश्यकता नाही, मात्र आपण केले तेच योग्य कसे होते आणि यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची कशी चूक होती असली मखलाशी करण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे.
आपल्या संपूर्ण कार्यकाळात ज्यांनी राज्यपाल कसा नसावा याचा वस्तुपाठ देशाला घालून दिला आहे असे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मगरमिठीतून अखेर महाराष्ट्राची सुटका झाली. त्यांची जागा दोन दिवसांपूर्वीच रमेश बैस यांनी घेतली . खरेतर आता भगतसिंह कोश्यारींनी आपल्या स्वत:च्या राज्यात, ज्याचा 'देवभूमी ' म्हणून गौरव होतो, त्या उत्तराखंडात जाऊन त्यांना हवे असलेले 'चिंतन' करायला हवे. तिथे एकांतात जाऊन चिंतन करावे त्यासाठी तिथे त्यासाठी गुफा देखील भरपूर आहेत, त्यामुळे त्यांनी आता तिथे कालक्रमणा करावी असे अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे राजभवन सोडल्यानंतर आता तरी ते महाराष्ट्रात लक्ष घालणार नाहीत असे वाटले होते. पण सुखासुखी जातील ते कोश्यारी कसले?
महाराष्ट्रातील महामानवांची अवहेलना करताना ज्यांची जीभ कचरली नव्हती, ते कोश्यारी महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना दोष दिल्याशिवाय राहतील तरी कसे ? विंचू जसा आपला गुणधर्म कोठेच सोडत नाही, तसे कोश्यारींचे आहे. हा महाराष्ट्र आपल्याला कधीच विसरणार नाही हे पुरते समजून चुकलेल्या कोश्यारींनी आता, त्यांच्या कार्यकाळात जे काही झाले त्यात 'मम पामराची चूक ती काय? 'असा राग आळवायला सुरुवात केली आहे. राज्यपाल ज्या दोन घटनांमुळे चर्चेत आले, त्या पहाटेचा शपथविधी आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच खापर फोडणारी मुलाखत कोश्यारींनी दिली आहे. 'मी लगेच सही करणार होतो, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रातील भाषाच योग्य नव्हती. त्या पत्रातून राज्यपालांना धमकी देण्यात आली होती' असा कंठ आता कोश्यारींना फुटला आहे. एकवेळ त्या पत्रातील भाषा कोश्यारींना खटकली असे खरे मानुयातही काही काळ, पण म्हणून आमदारांची नियुक्तीचा करायची नाही हे कोणत्या नैतिकतेत बसते? कोशयारीनी जे काही आपल्या दिल्लीतल्या नेत्यांना खुश करण्यासाठी केले, त्याला आता नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न कोश्यारी करीत आहेत.
जे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुकीबाबत तेच पहाटेच्या शपथविधीबाबत . 'अजित पवारांनी सह्यांचे पत्र दिले म्हणून मी राष्ट्रपती राजवट उठविली' असे आता कोश्यारी बोलत आहेत. अर्थात आज कोश्यारी जे सांगत आहेत, त्यात ते नवीन काहीच सांगत नाहीत. त्या घटनाक्रमाच्यावेळी हे सारे समोर आलेच होते. पण राज्यपाल म्हणून या पत्राची किमान खातरजमा करण्याची त्यांची नैतिक जबाबदारी नव्हती का ? आणि जरी त्यावेळी अजित पवार आणि फडणवीसांच्या बाजूने बहुमत होते असे चर्चेकरिता मान्य केले, तरी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट हटवून लगेच शपथविधीचा 'ब्रह्ममुहूर्त ' साधण्यासारखी अशी काय तातडी महाराष्ट्रात निर्माण झाली होती ? एखाद्या सरकारचा शपथविधी हा खरेतर लोकशाही व्यवस्थेतला मोठा सोहळा होतो, तो असा 'चोरी चोरी छुपके छुपके' करण्यामागे कोश्यारींची कोणती नैतिकता होती, यावर मात्र कोश्यारी कांहीच बोलत नाहीत. खरेतर कोशयारीनी आता काहीच बोलायला नको होते. त्यांच्या टोपीप्रमाणेच त्यांचे मन देखील कसे काळे आहे, हे राज्याने अनुभवले आहेच. अगदी सर्वोच्च न्यायालयात जेव्हा राज्यपालांचे वकील 'निवडणूकपूर्व युती आघाडीवर' चर्चा करतात, त्यातच कोश्यारी करीत असलेले राजकारण उघड झाले आहेच. त्यामुळे आता तरी त्यांनी सुखाने जाणे अपेक्षित असताना असली मखलाशी करून ते त्यांच्या राजकीय सामाजिक अनैतिकतेवर पांघरूण घालू पाहात आहेत.