बीड - बीड शहराचा मध्यवर्ती चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला मागच्या चार दिवसांपासून बॅनरचा वेढा पडला आहे. स्पर्धा लागल्यासारखे मोठमोठे बॅनर येथे लावले जात असून यामुळे महाराजांचा पुतळा तर झाकला जात आहेच, मात्र सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अगदी अर्धा अर्धा तास होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका देखील अडकून पडत आहेत. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे पाच पन्नास बळी गेल्याशिवाय नगरपाईला आणि प्रशासन बॅनर काढणार नाहीत का ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मागच्या ४ दिवसांपासून बीड शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला बॅनरचा अक्षरशः वेढा पडला आहे. बॅनरमुळे संपूर्ण चौक झाकोळला आहे. तर समोरचे दिसणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज एका 'बॅनरबॉय ' च्या नव्या बॅनरची भर यात पडत आहे. त्यामुळे चौकातील अस्वथ बिकट झाली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्याच्या नावाखाली ही चमकोगिरी सुरु आहे, त्या महाराजांचा पुतळा देखील यात झाकून जातो का काय अशी परिस्थिती आहे. बॅनरच्या या वेढ्यामुले चौकात अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मोठी वाहने या वेढ्यातून बाहेर काढायची कशी असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. समोरच्या वळ्णावरचे दिसत नसल्याने सातत्यानेयेथे वाहतूक कोंडी होत आहे. एकदा का वाहतूक कोंडी झाली कि मग अर्धा अर्धा तास वाहतूक सुरळीत होत नाही. हा शहराचा मध्यवर्ती चौक आहे. जिल्हा रुग्णालय असेल किंवा बसस्थानक येथे जाण्यासाठी याच चौकाचा वापर करावं लागतो. येथील वाहतूक कोंडीत अगदी रुग्णवाहिका देखील अडकत आहेत. यात एखाद्या रुग्णाचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी कोणाची ? या अनधिकृत बॅनरबद्दल मागच्या चार दिवसांपासून माध्यमांमध्ये ओरड होत असली तरी प्रशासन आणि नगरपालिका मात्र मूग गिळून आणि डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. आता हे बॅनर काढण्यासाठी अधिकाऱ्यांना ५-५० नागरिकांचे बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का ? असा प्रश्न पडला आहे.
कोणाला बदलीची भीती, तर कोणाला चौकशीची
या चौकात लागलेले बॅनर मोठ्याप्रमाणावर वेगवेगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांचे आहेत. मागच्य काही काळात बीड जिल्ह्यात विविध पक्षांच्या पुढार्यांनी अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पातळीवर तक्रारी करायच्या, बदल्यांसाठी अर्ज करायचे अशी मोहीम उघडलेली आहे. यात कोणीच मागे नाही. अधिकाऱ्यांना जिल्ह्यात राहायचे असेल तरी पुढाऱ्यांचे हातचे बाहुले बनावे लागते आणि इच्छित स्थळी जायचे असले तरी पुढाऱ्यांच्या कलाने वागावे लागते इतकी स्फोटक परिस्थिती जिल्ह्यात आहे. त्यामुळे बदली होऊ नये किंवा चौकशी लागू नये म्हणून पुढाऱ्यांचे आशीर्वाद मिळवावे लागत असतील तर त्या पुढाऱ्यांच्या बँनरला अधिकारी हात लावणार तरी कसे ? यात लोकांचे हाल झाले काय आणि दहा वीस माणसे मेली काय, आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना देखील त्याचे काहीच पडले नसल्याची परिस्थिती आहे.