पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या घडीला देशातील सर्वोत्तम वक्ते आहेत हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वशैलीशी तुलना करू शकेल असा दुसरा कोणी भाजपात तर नाहीच , मात्र विरोधीपक्षात देखील नाही. त्यामुळेच मूळ विषयाला बगल देऊन देखील , कळीच्या मुद्द्यांवर मौन बाळगून देखील टाळ्या कशा मिळवायच्या आणि वाहवाह कशी करून घ्यायची याबाबत मोदींना तोड नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तरासाठी त्यांनी संसदेत जे भाषण केले, त्यातून पुन्हा एकदा देशाला त्यांच्यातील फर्डा वक्ता अनुभवायला मिळाला . मिळाली नाहीत ती देशापुढच्या ज्वलंत प्रश्नांवरची उत्तरे. परीक्षा एका विषयाची असताना , दुसऱ्याच विषयाची उत्तरे देत मोदींनी भाषणाचे मैदान मारले पण देशाला पडलेल्या प्रश्नांचे काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे ऐकणारांसाठी एक पर्वणीच असते. काय तो आवेश, काय ते शब्दचापल्य , काय ती आक्रमकता आणि विरोधकांचा समाचार घेण्याची काय ती शैली , केवळ भाषणावर जर महासत्ता होता आले असते , तर आपला देश केव्हाच खऱ्या अर्थाने 'विश्वगुरू ' बनला असता . संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी केलेले भाषण म्हणजे वक्तृतव शिकू पाहणारांसाठी एक उत्तम उदाहरण म्हणावे असेच होते. त्यात काय नव्हते ? काँग्रेसने आतापर्यंत देशाचे कसे वाटोळे केले, संपुआच्या सत्ताकाळात एका दशकात देश किती मागे गेला, २ जी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ , हेलिकॉप्टर खरेदीचे कथित घोटाळे, संपुआच्या सत्ताकाळात आलेले दहशतवादी हल्ले अशा अनेक मुद्द्यांवर आक्रमकपणे बोलणारे मोदी आणि टाळ्या वाजविणारे भाजपचे खासदार, हे चित्र आज सारा देश पाहत होता. यातले सारेच मुद्दे यापूर्वी अनेकदा बोलून झाले आहेतच , जोडीला मोदींनी जी राहुल गांधींवर टीका केली, ती देखील यापूर्वीच्या टीकेचीच री ओढणारी, मात्र हे सारे मोदी असे काही बोलत होते, की जणू ते पहिल्यांदाच बोलत आहेत. समोरच्याला संमोहित केल्यावर काहीही ऐकीव.ले तरी तो जशी केवळ मान हलवतो , तसे मोदींनी या भाषणाने देखील करून दाखविले. त्यामुळे भाषण कसे झाले असा प्रश्न जर विचारला गेला , तर मोदींना निश्चितपणे १०० % गुण द्यावेच लागतील. वादविवाद स्पर्धांमध्ये जसा एखादा स्पर्धक, कोणत्याही पद्धतीने समोरच्याचे मुद्दे खोडात असतो, आणि केवळ स्पर्धा जिंकायची म्हणून काहीही ठासून सांगत असतो, तसे मोदींचे भाषण होते. म्हणून ज्यांना भविष्यात वादविवाद स्पर्धा करायच्या आहेत, त्यांनी या भाषणाची शेकडो आवर्तने करायलाच हवीत.
मात्र हे भाषण कितीही चांगले झाले असले, तरी हे भाषण कोणत्या स्पर्धेसाठी नव्हते आणि बोलणारा व्यक्ती केवळ स्पर्धक नव्हता, तर एका देशाचा पंतप्रधान, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत बोलत होता , हे लक्षात घेतले तर मात्र या भाषणातून देशाला काय मिळाले ? हे पाहणे महत्वाचे असते. आज देशासमोर अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, ज्याची उत्तरे देशाला हवी आहेत. २०१४ मध्ये जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६०९ क्रमांकावर असणारा व्यक्ती अचानक ९ वर्षातच पहिल्या दहांमध्ये कसा येतो ? सामान्यांना लाखभर रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल तर बँका आडकाठी आणतात, मात्र गौतम अदाणीच्या उद्योगसमूहाला हजारो कोटींची कर्जे कशी मिळतात ? अदानी उद्योग समूहासाठी विमानतळ खाजगीकरांचे नियम कसे बदलले जातात , अदाणींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नेमका किती धक्का बसणार आहे ? असे अनेक प्रश्न आज देशातील जनतेला पडलेले आहेत. यावर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. केवळ संसदेत आकडेवरी देणार्या राहुल गांधींची नाव न घेता खिल्ली तेवढी त्यांनी उडविली . ठीक आहे, अदानी मित्र असल्याने एकवेळ मित्रासाठी त्यांनी बोलणे टाळले असेल, मात्र त्याशिवाय देखील देशातील 'हेट स्पीच 'वर न्यायालयांनी व्यक्त केलेली चिंता , न्यायव्यवस्थेवर देशाचे कायदेमंत्रीच उपस्थित करीत असलेले प्रश्न यावर मोदी काही तरी बोलतील असे अपेक्षित होते , मात्र मोदींनी त्यावरही काही बोलणे टाळले. वाढती बेरोजगारी, देशातील वाढती महागाई यावर देखील मोदी काहीच बोलले नाहीत. जे बोलले ते म्हणजे ते नव्या बाटलीत जुनीच दारू याच धाटणीचे होते .