सत्यजित तांबे यांचे बंड , त्यात त्यांचा झालेला विजय आणि आता त्या विजयाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांनी घेतलेली भूमिका, यामुळे काँग्रेस पक्षापुढे अनेक प्रश्न आहेतच. यापूर्वी काँग्रेसला मध्यप्रदेश , राजस्थान आणि अगदी पंजाबमध्ये देखील मोठ्या नेत्यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागलेच आहे. काँग्रेस पक्ष मधल्या काळात सरंजामदारांचा झाला आहे, आता त्या सरंजामदारांपुढे झुकून तात्पुरती मलमपट्टी करायची, का त्यांच्या शिवाय नवी सुरुवात करायची हे ठरविण्याची वेळ काँग्रेस श्रेष्ठींसमोर आहे,. हा पक्षाच्या दृष्टीने कसोटीचा काळ आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ज्यावेळी थोरातांचे भाच्चे असलेल्या सत्यजित तांबे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्ष उमेदवारी दाखल केली, त्याच वेळी, हे काही थोरातांच्या परोक्ष झाले असेल असे नव्हते. त्यामुळे तांबेंच्या मागे कोणाची शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विखे पितापुत्रांनी हाच प्रयोग केला होताच .
विखे काय किंवा थोरात काय , किंवा आणखी कोणतेही नेते, मग ते चव्हाण असतील किंवा देशमुख , किंवा त्या त्या प्रदेशानुसार, त्यांची नावे वेगळी असतील. पण हे सारे पक्षातील सरंजामदार आहेत. आणि त्यांची सरंजामदारी पक्षानेच वाढविली आहे. पक्षाने या सरंजामदारांना शक्ती दिली, त्याच्या जोरावर यांनी संस्था उभारल्या, संस्था कसल्या , संस्थानेच उभारली. आणि हे सारेच नेते संस्थानिक बनले. एकदा का नेता संस्थानिक बनला की , त्याला सर्वाधिक भय असते ते आपले संस्थान खालसा होईल याचे , आणि मग आपले संस्थान खालसा होऊ नये म्हणून हे संस्थानिक कोणाशीही तडजोड करू शकतात , हा आपला इतिहास आहे. आज काँग्रेसमध्ये जे काही होत आहे, ते याच तडजोडींमधून होत आहे. आतापर्यंत पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये हे झाले, आता त्याचे प्रयोग महाराष्ट्रात सुरु आहेत.
जोपर्यंत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला सत्तेचा लाभ होत होता, तो पर्यंत पक्षातील या नेत्यांना पटोलेंना सहन करणे भाग होते. नाना पटोले यांचे कार्य आदर्श आहे, किंवा त्यांचा हेकेखोरपणा योग्य आहे असे आम्हाला म्हणायचे नाही. मात्र त्यांचा हा हेकेखोरपणा काही आजचा नाही. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासूनच आहे. मात्र सत्तेच्या काळात त्यांचा हा हेकेखोरपणा खपवून घेतला जात होता, आतच थोरात काय किंवा तांबे काय किंवा आणखी कोणी , यांना पटोले आताच डोईजड वाटण्यामागे, काँग्रेसला सत्ता मिळण्याची इतक्यातच दिसत नसलेली संधी आणि त्यामुळे आपली संस्थाने खालसा होण्याची असलेली भीती हेच प्रमुख कारण आहे. मागच्या ७-८ दशकात काँग्रेसने केवळ असले संस्थानिक मोठे केले, आता त्यांना पक्षापेक्षा स्वतःची अधिक चिंता आहे, आणि म्हणूनच असे अनेकजण केवळ कारणाच्या शोधात आहेत. थोरातांच्या बाबतीत आज तेच म्हणावे लागेल.
थोरात, तांबे किंवा आणखी कोणी, ते यापेक्षा वेगळे वागूच शकत नाहीत. प्रश्न त्यांचा नाहीच, प्रश्न आहे तो काँग्रेस पक्षाचा. या पक्षाने आता काय निर्णय घायचा याचा. आजची गरज म्हणून या संस्थानिकांसमोर झुकून त्यांच्या मर्जीने चालायचे का पडेल ती किंमत चुकवायची तयारी ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करायची हा. असेही आज तरीलगेच काँग्रेसची सत्ता येईल अशी चिन्हे नाहीत, म्हणजे काँग्रेसला प्रयोग करायला आणि संघटनात्मक बांधणी करायला भरपूर वेळ आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नसतो हे यापूर्वी तत्कालीन जनसंघाने आणि आताच्या भाजपने, अनेकदा डाव्यांनी दाखवून दिले आहे, म्हणूनच आज हे पसंख संघटन म्हणून तागडे आहेत. डाव्यांना या संघटनेला सत्ताकारणात बदलण्यात फारसे यश आले नसेल, मात्र भाजपने प्रतीक्षा करून का होईना, संघटनाच्या जोरावर सत्ता मिळविता येते हे दाखवून दिले आहेच. त्यामुळे आता सरंजामदारांनाच पुन्हा पायघड्या अंथरायच्या का नव्याने कार्यकर्ता घडवायचा, जाणारांना दारे मोकळी ठेवून नव्याने सुरुवात करायची हे ठरविण्याचा हा काँग्रेससाठी कसोटीचा काळ आहे.