Advertisement

तायक्वांदो असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉ.अविनाश बारगजे

प्रजापत्र | Monday, 30/01/2023
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी)-तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( मुंबई) राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.अविनाश बारगजे  (बीड) यांची तसेच महासचिवपदी  मिलिंद पठारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मराठवाडा व विदर्भ मधील क्रीडा संघटकांना  राज्य कार्यकारिणी मध्ये विशेष प्राधान्य मिळाले आहे.

 

 तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक ॲड. राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठाचे वकील तथा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विजय ढाकणे यांच्या निरिक्षणाखाली सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाची निवडणूक पार पडल्यानंतर विविध राज्यांतील अधिकृत राज्य संघटनांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. टी.एफ.आय. च्या निर्देशानुसार तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या राज्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक औरंगाबाद येथे २९ जानेवारी २०२३ रोजी  पार पडली. प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. त्यानुसार अध्यक्ष - डॉ. अविनाश बारगजे (बीड),उपाध्यक्ष- विनायक गायकवाड (मुंबई उपनगर) व धुलीचंद मेश्राम  (गोंदिया ),महासचिव - मिलिंद पठारे,सचिव - सुभाष पाटील (रायगड ),खजिनदार - व्यंकटेश्वरराव कररा (रत्नागिरी ),  नीरज बोरसे (औरंगाबाद ), अजित घारगे  (जळगाव ) व सतिश खेमसकर (चंद्रपूर) यांची कार्यकारी सदस्यपदी निवड झाली आहे. दोन वेळा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राहीलेले श्री प्रविण बोरसे व सुशांत भोयार यांच्यावर अतिरिक्त उपाध्यक्ष पदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणी मंडळाने दिली आहे.
 

Advertisement

Advertisement