अंबाजोगाई - शहरालगत असलेल्या मोरेवाडीतील ७ वर्षीय बालकाचा नव्याने बांधलेल्या घरातील हौदात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) उघडकीस आली. रुद्र शिवराज मोरे (वय ७) असे त्या मृत बालकाचे नाव आहे. रुद्र सध्या पहिलीच्या वर्गात शिकत होता.
मोरेवाडी येथील शिवराज मोरे हे स्लायडिंग खिडक्यांचे काम करतात. त्यांना अनुक्रमे रुद्र (वय ७) आणि ५ वर्षाचा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. शिवराज यांनी नुकतेच चनई शिवारात नवीन घर बांधले होते. शनिवारी (दि.२८) रोजी ते पत्नी आणि दोन मुलांसह नवीन घरात राहण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी नित्यनेमाप्रमाणे शिवराज कामावर निघून गेले. सकाळी अंदाजे साडेदहा वाजताच्या सुमारास रुद्र खेळत खेळत घरातील पाण्याच्या उघड्या हौदाजवळ गेला आणि हौदात पडला. बराच वेळ झाला रुद्र दिसत नसल्याने त्याच्या आईने शोध घेतला असता हौदाजवळ रुद्रची चप्पल दिसून आली. त्यामुळे तातडीने त्यांनी शिवराज यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी हौद तपासला असता आतमध्ये रुद्र आढळून आला. त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. रविवारी दुपारी रुद्रच्या पार्थिवावर मोरेवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मोरेवाडीवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.