अंबाजोगाई - अंबासाखर परिसरात कोणताही परवाना नसताना बिनबोभाट सुरु असलेल्या कलाकेंद्रावर शनिवारी (दि.२१) सायंकाळी अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी १८ नृत्यांगना नृत्य करताना आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी कलाकेंद्राच्या तीन व्यवस्थापकांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
अंबासाखर वाघाळा परिसरातील पायल कलाकेंद्र येथे विनापरवाना नृत्याचे कार्यक्रम चालू असल्याची माहिती मिळाल्याने अपर अधीक्षक कविता नेरकर यांनी त्यांच्या पथकाला केंद्राचा परवाना तपासून कारवाई करण्यासाठी पाठविले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ७.५० वा. पोलिसांनी कलाकेंद्रावर छापा मारला असता तिथे वेगवेगळ्या लहानमोठ्या हॉलमध्ये एकूण १८ नृत्यांगना ग्राहकांसमोर नृत्य करताना आढळून आल्या. पोलिसांनी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे चौकशी केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कलाकेंद्रातील सामान जप्त करून संतोष नरहरी काशीद (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई), सय्यद तिलावत सय्यद अक्सर अली (रा. सायगाव, ता. अंबाजोगाई) आणि संतोष लक्ष्मण तोळंबे (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई) या तीन व्यवस्थापकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पो.ह. अनिल दौंड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला. ही कारवाई अपर अधीक्षक नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिंदे, पीएसआय शिंगाडे, पोलीस कर्मचारी गायकवाड, तागड, आंबाड, दौंड, भागवत, राऊत यांनी पार पाडली.