Advertisement

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 'स्वाराती' सलग चौथ्यांदा मराठवाड्यात अव्वल

प्रजापत्र | Monday, 16/01/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.१६ (प्रतिनिधी)-गोरगरीब रुग्णांकरीता जीवनदायी ठरलेल्या महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेच्या अंमलबजावणीत महानगर क्षेत्रातील लातुर, नांदेड, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयाने सलग चौथ्या वर्षे मागे टाकत याही वर्षी आपला प्रथम क्रमांक कायम ठेवण्याचा विक्रम केला आहे.
      सव्वा दोन कोटी कूटूंबांना ९७१ आजारांवर मोफत ऊपचार देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 2022 या वर्षात 6299 रुग्णांना ऊपचार दिल्याने शासनास १० कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे अशी माहीती योजनेचे प्रमुख डॉ. नितीन चाटे यांनी दिली आहे.2012 साली राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने आरंभ झालेल्या आरोग्य विमा योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक सव्वा दोन कोटी कुटूंबियांना मिळत असुन दरवर्षी एका कुटुंबास शस्त्रक्रीया व  आजारांवर दिड लाख रुपयांपर्यंतचे ऊपचार मोफत दिले जातात. एप्रिल 2017 साली सदरील योजनेचे नामकरन महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना असे तर 2020 साली महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजना असे करण्यात आले आहे. राज्यभरात 54 लाख रुग्णांना या योजनेअंतर्गत आंतररुग्ण आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे .
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे हे ऑक्टोबर 2018 पासुन या योजनेचे प्रभारी असुन त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात स्वाराती रुग्णालयाने 22 हजार रुग्णांना योजनेचा लाभ मिळवुन देत तब्बल 40 कोटी रुपयांहुन अधिक विमा रक्कम शासनास मिळवुन दिली आहे.

Advertisement

Advertisement