Advertisement

हिशोब सादर न करणाऱ्या उमदेवारांवर अपात्रतेची टांगती तलवार!

प्रजापत्र | Friday, 30/12/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या विजयी व पराभूत उमेदवारांना निवडणूकीत झालेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असते. येत्या  ३० दिवसांत म्हणजेच २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्च सादर न केल्यास पुढील निवडणूक या उमेदवारांना लढवता येणार नाही. अपात्र ठरण्याच्या भीतीने निवडणूक खर्च सादर करण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील ७८६ विजयी, पराभूत व बिनविरोध उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे.   
        निवडणूक विभागाच्या आदेशान्वये  ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या अशा उमेदवारांनी खर्च सादर करणे नियमानुसार बंधनकारक आहे. प्रत्येक निवडणुकीवरील खर्चासाठी शासनाने मर्यादा ठरवून दिलेली आहे. पूर्वी सरसकट २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा ठरविली होती; मात्र आता २०१७ पासून बदल करून ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार त्यात वाढ करण्यात आली आहे. त्या रकमेचा खर्च निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर पुढील ३० दिवसांत निवडणूक विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. जे उमेदवार या कालमर्यादेत खर्च सादर करणार नाहीत, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यावर बंदी घातली जाते. मोठ्या मेहनतीने निवडून आल्यानंतर  केवळ  खर्च न सादर केल्यामुळे अपात्र होऊ नये, या भीतीने निवडणूक खर्च सादर करण्यासाठी उमेदवार धावपळ करू लागले आहेत.

 

ऑनलाईन सादर करावा लागणार खर्च
ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना  आपल्या खर्चाचा लेखाजोखा ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. याशिवाय, संबंधित उमेदवारास ऑनलाइन सादर केलेल्या  खर्चाची प्रिंट काढून व त्यावर उमेदवारांनी स्वाक्षरी करून ती विहित मुदतीत  अंबाजोगाई निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात दाखल करून त्याची पोच घेणे आवश्यक आहे. तसेच बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनाही खर्च सादर करणे सक्तीचे आहे.

 

सरपंचपदासाठी खर्चाची मर्यादा
७ ते ९ सदस्य - ५० हजार
१२ ते १३ सदस्य - १ लाख
१५ ते १७ सदस्य - १.७५ लाख

 

सदस्यपदासाठी  खर्चाची मर्यादा
७ ते ९ सदस्य - २५ हजार
१२ ते १३ सदस्य - ३५ हजार
 १५ ते १७ सदस्य - ५० हजार

 

Advertisement

Advertisement