Advertisement

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक

प्रजापत्र | Sunday, 25/12/2022
बातमी शेअर करा

भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नव्हती. इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामातील बाद फेरीच्या सामन्यांसाठी सुनील गावस्कर समालोचन करू शकले नाहीत, कारण ते त्यांच्या आजारी आईला भेटायला गेले होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या समालोचनासाठी सुनील गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत.

 

95 वर्षांच्या होत्या मीनल गावस्कर
सुनील गावस्कर यांच्या आई मीनल गावस्कर या 95 वर्षांच्या होत्या. मुंबईतच त्यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावस्कर यांच्या आईचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. मात्र, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही गावसकर यांनी आपली समालोचन सुरू ठेवत आपले कर्तव्य बजावले. त्यांनी लोकांसमोर त्यांचे दु:ख अजिबात मांडले नाही. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सामना जिंकला होता.

 

 

वर्षभरापासून होत्या आजारी
मीनल गेल्या एक वर्षापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलदरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयपीएलसाठी कॉमेंट्री करणाऱ्या गावसकर यांना आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी बायो-बबलमधून बाहेर पडावे लागले होते. बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी सामना चार दिवसात संपल्यानंतर गावस्कर आपल्या आईच्या अंतिम संस्कारासाठी लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे.सुनील गावस्कर दीर्घकाळापासून प्रॉडक्शनमध्ये आहेत आणि सतत कॉमेंट्री करताना दिसतात. आपल्या खेळाच्या कारकीर्दीच्या समाप्तीपासून सुनील गावस्कर सातत्याने समालोचन करत आहेत. यासाठी ते जगभरात भ्रमंती करतात. सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्करची खेळण्याची कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही, पण आता तो कॉमेंट्रीमध्येही चांगली लोकप्रियता मिळवत आहे. रोहन मुख्यतः देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो.

 

 

कसोटीत 10,000 धावा करणारे गावसकर पहिले फलंदाज
73 वर्षीय गावस्कर यांनी भारतासाठी 125 कसोटीत 51.12च्या सरासरीने 10,122 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 34 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये चार द्विशतकांमध्ये रूपांतरित झाले आहेत. याशिवाय त्यांनी 45 अर्धशतकेही केली आहेत. गावस्कर यांनी भारतासाठी 108 एकदिवसीय सामनेदेखील खेळले आहेत आणि 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचे ते भाग होते. गावस्कर यांनी वनडेमध्ये 35.14च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी एक शतक आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत.
 

Advertisement

Advertisement