या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम राहिल्याने हाहा:कार उडाला. गुंतवणूकदारांच्या चौफेर विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 60 हजार अंकांखाली आला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 18 हजार अंकांखाली घसरला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला आले.
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 980 अंकांच्या घसरणीसह 59,845 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 320 अंकांच्या घसरणीसह 17,806 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात आलेल्या सुनामीमुळे एकाच दिवसात 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला. गुरुवारी बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील लिस्टेड कंपनीचा मार्केट कॅप 280.53 लाख कोटी रुपये होता. शुक्रवारी बाजारात झालेल्या घसरणीमुळे मार्केट कॅप 272.37 लाख कोटी इतका झाला. बाजारात आज आलेल्या सुनामीत सगळ्याच सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग सेक्टरमध्ये 1.75 टक्क्यांची घसरण दिसून आली. ऑटो सेक्टरमध्ये 2.54 टक्के, आयटी सेक्टरमध्ये 1.83 टक्के, पीएसयू बँकेच्या सेक्टरमध्ये 6.06 टक्के, एफएमसीजीमध्ये 1.71 टक्के, मेटल्समध्ये 4.47 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. एनर्जीस सेक्टरमध्ये 4.86 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. निफ्टी 50 मधील फक्त तीन कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. यामध्ये सिप्लामध्ये 0.24 टक्के, डिवीज् लॅबमध्ये 0.22 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली. कोरोना महासाथीच्या संकटाच्या सावटामुळे बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. आज मिडकॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 3.76 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी, मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3655 कंपन्यांचे व्यवहार झाले. त्यातील फक्त 472 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 3115 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 68 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. जागतिक शेअर बाजारात झालेली (Indian Share Market) पडझड आणि कोरोना महासाथीची (Coronavirus) भीती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 314 अंकांच्या घसरणीसह 60,512 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 91 अंकांच्या घसरणीसह 18036 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून येत होता. सकाळच्या सत्रात फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतरही त्यात विक्रीचा दबाव वाढू लागला.