Advertisement

आता महाराष्ट्र-गुजरात सीमेवरही वादाची ठिगणी

प्रजापत्र | Saturday, 10/12/2022
बातमी शेअर करा

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद (Karnataka maharashtra border dispute) सुरू असतानाच आता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तलासरीतील (Maharashtra Talasari) सीमेवर असलेल्या वेवजी आणि गुजरातमधील सोळसुंबा या ग्रामपंचायतींचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने या ग्रामपंचायतींचा वाद सुरूच आहे. गुजरातमधील सोळसुंभा ग्रामपंचायतने वेवजी ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारलेले पथदिवे वेवजी ग्रामपंचायतने बंद केले असून हा सीमावाद लवकर मिटवावा अशी मागणी येथील सीमावासियांकडून करण्यात येत आहे.

 

वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता

कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाप्रमाणेच गुजरात आणि महाराष्ट्र सीमा वादही सुरूच आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तलासरीतील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातमधील सोळसुंबा ग्रामपंचायत अतिक्रमण करत असल्याचा आरोप वेवजी ग्रामपंचायत आणि येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. गुजरातच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीला वीज पुरवठा करण्यासाठी सोळसुंबा ग्रामपंचायतने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीतून पथदिवे उभारले असून यानंतर हे अतिक्रमण सुरू झाल्याचा आरोप येथील सरपंच आणि ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेले सर्व पथदिवे सध्या बंद करण्यात आले असून यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पथदिव्यांच्या नावाखाली गुजरात मधील सोळसुंबा या ग्रामपंचायतने महाराष्ट्रातील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे . 

 

दोन्ही ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने वाद 

वेवजी आणि सोळसुंबा या दोन्ही ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने हा वाद मागील अनेक वर्षांपासून चिघळला आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले बुरुज आजही या ठिकाणी दिसून येत असून ते सध्या अडगळीत पडले आहेत. याबाबत हद्द निश्चितीसाठी ग्रामपंचायतकडून सरकार आणि वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार केला जातोय. वरिष्ठ पातळीवर ही बैठक होतात मात्र अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही. बैठकांमधून कोणताही निर्णय न झाल्याने येथील ग्रामस्थांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे भूमी अभिलेखकडून ही मोजणी करून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील सरकारांनी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

 

वेवजी आणि सोळसुंबांचा सुरू असलेला वाद हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाइतका इतका आज ज्वलंत नसला तरी मागील अनेक वर्षांपासून याची धुसफुस सुरू आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याआधीच सरकारने यात हस्तक्षेप करून या दोन्ही राज्यांची हद्द निश्चिती करावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत. 

Advertisement

Advertisement