Advertisement

दहा वर्षात केजरीवालांच्या 'आप'ची राष्ट्रीय पक्ष म्हणून झेप

प्रजापत्र | Thursday, 08/12/2022
बातमी शेअर करा

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष 2012 मध्ये जन्माला आला. दोन आठवड्यानंतर हा पक्ष दहा वर्षांचा होईल आणि आपला दहावा वर्धापनदिन आप राष्ट्रीय पक्ष म्हणून साजरा करेल. आज गुजरातच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच आपच्या नेत्यांनी दिल्लीत एकच जल्लोष केला. आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार असल्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा जल्लोष होता. मग, प्रश्न असा आहे की कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर खालीलपैकी एका अटीची पुर्तता करावी लागते

 

राष्ट्रीय पक्ष कसा ठरतो? 

तीन वेगवेगळ्या राज्यांमधून लोकसभेतील किमान दोन टक्के जागा जिंकलेल्या असाव्यात. त्याशिवाय लोकसभेत कमीत कमी चार खासदार असावेत. चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांत किमान सहा टक्के मतं असावीत. किमान चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.

दिल्ली, गोवा आणि पंजाब मध्ये आपला राज्य पक्षाच्या दर्जाची कामगिरी जमली होतीच. दिल्ली विधानसभा 2020 निवडणुकीत आप पक्षानं 62 जागा जिंकल्या. मतांची टक्केवारी 57 टक्के राहिली. गोवा विधानसभा 2022 मध्ये दोन जागा जिंकल्या. मतांची टक्केवारी सात टक्के होती. पंजाब विधानसभा 2022 मध्ये आप पक्षानं इतिहास रचला. आप पक्षानं 92 जागांवर विजय मिळवला तर मतांची टक्केवारी 42 इतकी होती. आता राज्य पक्षाचा दर्जा गुजरातमध्येही मिळवणं गरजेचं होतं. 13 टक्के मतं मिळवत आपनं ती कामगिरी साध्य केली. आप पक्षाला त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. 

Advertisement

Advertisement