Advertisement

नगर जामखेड रोडवर अपघात

प्रजापत्र | Sunday, 04/12/2022
बातमी शेअर करा

बीडहून मुंबईकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा आज पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर गाडी आदळली. यात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले आहेत.नगर तालुक्यातील निंबोडी या गावाजवळ हा अपघात झाला. या प्रकारणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामध्ये चालकाची पत्नी विनिता दीपक उघडे (वय 26) व मुलगी रास्वी दीपक उघडे (वय दीड वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मुलुंड येथील रहिवासी आहे. तर, दीपक सुधाकर उघडे (वय 30), एक महिला व तिची मुलगी जखमी झाले आहेत.

 

 

दीपक उघडे हे कुटुंबासह बीड येथून मुंबईकडे जात होते. नगर तालुक्यातील निंबोडी गावात आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा मोठा होता की आवाजामुळे आजूबाजूचे नागरिक तात्काळ या ठिकाणी जमा झाले. मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या या ठिकाणी थांबल्या होत्या.घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईक नगरच्या दिशेने निघाले. तर, दुसरीकडे जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे अमोल नवनाथ आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक सुधाकर उघडे (वय 30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement