परळी - तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची तोबा गर्दी झाली होती.
तहसील कार्यालयात व परिसरात उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. यातच वानटाकळी येथील सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नुकतीच प्रसूती झालेली एक महिला रुग्णवाहिकेतून येथे दाखल झाली. तान्ह्या बाळासह तिने उमेदवारी अर्ज दाखल केला. पल्लवी निवृत्ती माने असे या महिलेचे नाव आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आलेल्या गाड्यांच्या ताफा मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात सर्वत्र गर्दी दिसून आली.
आज उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज निवडणूक विभागात सादर केले. परळी तालुक्यातील बहुतांश गावात सरपंच व सदस्य पदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. तर काही गावात बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, अनेक गावांमध्ये तीन पॅनल तर काही गावात दोन पॅनलमध्ये थेट लढती होतील.
 
                                    
                                
                                
                              
