Advertisement

अंबाजोगाईतील कुख्यात गुंडावर 'एमपीडीए'नुसार कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 29/11/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई : व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या अंबाजोगाईतील कुख्यात गुंडावर एमपीडीए नुसार कारवाई केली आहे. त्यास २८ नोव्हेंबरला ताब्यात घेऊन २९ रोजी पहाटे औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.

 

 

मोहन दौलत मुंडे (२९,रा.क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द केज, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खंडीण मागणे, दिवसा व रात्री घरफोडी करणे, शिवीगाळ करुन जीेवे मारण्याच्या धमक्या देणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे आठ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी चार गुन्हे न्यायप्रविष्ठ असून चार तपासावर आहेत.  त्याच्याविरुध्द एमपीडीएनुसार(झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाईचा प्रस्ताव अपर अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन शहर ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवला. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरला एमपीडीए कारवाईस मान्यता दिली. त्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार,स्थानकि गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली २८ रोजी मोहन मुंडे यास ताब्यात घेतले. अंबाजोगाई शहर ठाण्यात हजर करुन नंतर त्याला बंदोबस्तात हर्सूल कारागृहात पाठवले. गुन्हे शाखेचे हवालदार अभिमन्यू औताडे, अंबाजोगाई शहर ठाण्याचे पो.ना. श्रीकृष्ण वडकर, गोरे यांचा या कारवाईत सहभाग होता.

 

प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हे
अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकरण अलीकडेच गाजले होते. गंभीर गुन्हे करत असल्याने पोलिस त्याच्यावर वॉच ठेऊन होते. दरम्यान, २२ सप्टेंबर २०२२ रोजी त्याच्या प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. मात्र, यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट गुन्हे करत सुटला होता.
 

Advertisement

Advertisement