बीड दि.११ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षक संवर्गातील बदली प्रक्रिया सन 2022 अंतर्गत बदली पात्र असलेल्या 1573 शिक्षकांच्या याद्या आज जाहिर केल्या आहेत. लवकरच जिल्हांतर्गत बदली बाबतची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान बदली पात्र शिक्षकांच्या याद्या जाहिर झाल्याने त्यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधीत शिक्षकांना तालुका कार्यालयाशी संपर्क करता येणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गातील बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने आज बदली पात्र असलेल्या म्हणजेच ज्यांची
जिल्ह्यातील एकुण सलग सेवा 10 वर्ष व सध्याच्या कार्यरत असलेल्या शाळेवर 5 वर्ष पुर्ण झालेली आहे. अशा 1573 शिक्षकांची यादी जाहिर करण्यात
आली आहे. सदर याद्या शिक्षणाधिकार्यांच्या लॉगीनवर प्राप्त झाल्या असुन त्या वेळापत्रकानुसार प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. याद्यांमध्ये बदलीच्या अनुषंगाने काही त्रुटी असल्यास सर्वप्रथम संबंधित शिक्षकाने आपल्या कार्यरत तालुका कार्यालयात रितसर लेखी अर्ज व कागदोपत्री पुराव्यासह संपर्क करावा, थेट जिल्हा कार्यालयात परस्पर संपर्क करू नये अशा सुचना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. 
 
                                    
                                
                                
                              
