Advertisement

“संजय राऊतांना विनाकारण अटक”

प्रजापत्र | Wednesday, 09/11/2022
बातमी शेअर करा

गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. ३१ जुलै २०२२ रोजी राऊत यांना अटक करून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. यानंतर राऊतांनी केलेल्या जामीन अर्जांना वेळोवेळी ईडीनं न्यायालयात विरोध केला होता. अखेर आज न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला आहे. शिवाय, यावेळी पीएमएलए न्यायालयाने ईडीचे कानही टोचले आहेत. संजय राऊतांना ईडीनं कोणत्याही कारणाशिवाय अटक केली होती, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला खडसावल्याचं वृत्त ‘लाईव्ह लॉ’नं दिलं आहे.

 

 

काय म्हटलं न्यायालयाने?
PMLA न्यायालयासमोर संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्यासोबतच प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे. यावेळी दिलेल्या आदेशामध्ये न्यायालयाने दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आल्याचं नमूद केलं आहे.“दिवाणी प्रकरणातील वादाला आर्थिक गैरव्यवहार किंवा आर्थिक गुन्ह्याचं लेबल लावल्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला अटक करता येणार नाही. समोर कोण आहे, त्याचा विचार न करता न्यायालयाला जे योग्य आहे, तेच करावं लागेल”, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे.“समोर आलेली कागदपत्र आणि न्यायालयासमोर झालेल्या सविस्तर चर्चेतून हे स्पष्ट झालं आहे की प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली आहे. हे सत्य स्पष्टपणे समोर आलं आहे”, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.

Advertisement

Advertisement