परळी दि.४ (प्रतिनिधी) - तुमच्या दवाखान्याला फायनान्स कंपनीकडून वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो असे म्हणत गुजरात राज्यातल्या काही भामट्यांनी परळी शहरातील डॉ.गायकवाड यांना चक्क 2 कोटीचे चंदन लावले. कर्जापायी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. याप्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान डॉक्टराने एवढी मोठी रक्कम भामट्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रवींद्र माणीकराव गायकवाड (वय 51 वर्षे) रा.वल्लभनगर शिवाजी चौक, परळी यांचे परळीमध्ये कृष्णाई नावाचे हॉस्पीटल आहे त्यांचे हॉस्पिटल त्यांना अत्याधुनिक करायचे होते, त्यासाठी त्यांनी विविध बँकेमध्ये कर्ज प्रस्ताव दाखल केले होते. मात्र बँकेकडून त्यांचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत. डॉ.गायकवाड यांना 9879966666 या क्रमांकावरून फोन आला व संबंधीतांनी डॉ.गायकवाड यांची चौकशी केली. भुज कच्छ फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट पाटनर फर्म भुज राज्य गुजरात येथून आम्ही कर्ज देवू असा तो व्यक्ती म्हणाला. या आमिषाला डॉ.बळी पडले. कर्ज तुम्हाला असं मिळणार नाही, त्यासाठी 10 टक्के टक्केवारी द्यावी लागेल असंही संबंधीत व्यक्ती म्हणाला. तुम्हाला आम्ही 20 कोटी कर्ज मिळवून देवू असं संबंधीताकडून सांगण्यात आले. त्यानुसार कागदपत्रांची संबंधीतांनी छाननी केली आणि 4-12-2017 रोजी उस्मान नोडे, शेख कासीम आणि दिलावर वली मोहम्मद कक्कल यांना बीडच्या शासकीय विश्रामगृहावर 47 लाख रुपये नगदी देण्यात आले. त्यानंतर डॉ.गायकवाड आणि संबंधीतांमद्ये चर्चा होत राहिली आणि पुन्हा मग संबंधीतांनी पैशाची मागणी केली त्यानुसार गायकवाड यांनी पैसे दिले. 26-02-2022 रोजी पुन्हा व्यवहार झाला असे एकूण 2 कोटी रुपये डॉ.गायकवाड यांच्याकडून उस्मान नोडे, लियाकत अली, कासीम शेख, रफीक शेख, राजु पटेल, रामजी पटेल, हैदर बवावु यांच्यासह आदींनी घेतले. पैसे दिल्यानंतर कर्जाचे काय झाले याबाबत गायकवाड यांनी संबंधीताकडे विचारपूस केली असता संबंधीत नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत होते. आपली यामध्ये मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानुसार भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका डॉक्टरची एवढी मोठी फसवणूक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.