परळी दि.४ (प्रतीनिधी) - तालुक्यात चोऱ्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. दररोज चोऱ्यांच्या घटना घडतच आहेत. परळी शहरातील हनुमान मंदिरातील दोन दान पेट्या फोडून चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातील बँक कॉलनी भागात घरफोडीची मोठी घटना घडली आहे. या घटनेत 11 लाखापेक्षा अधिक रकमेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. वाढत्या चोऱ्या हे परळी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
      परळी शहरातील बँक कॉलनी भागात राहणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या घरातील कपाटातून ११ लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, टीव्ही, दुचाकी असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक कॉलनी भागात राहणारे हॉटेल व्यावसायिक बाबासाहेब नानाभाऊ मुंडे हे बाहेरगावी आपल्या कुटुंबासह गेले होते. घरात कोणीही नव्हते. याचा फायदा घेत त्यांच्या घराचा दरवाजा दोन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. घरातील ११ लाख ८७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला, त्यामध्ये रोख अडीच लाख रुपये व सोन्याच्या नऊ अंगठ्या, एक ब्रासलेट, टीव्ही व दुचाकी असा ऐवज आहे.  दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या तपासासाठी एक पथक नियुक्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली. घटनास्थळी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, पो. नि. कस्तुरे यांनी भेट दिली आहे. 
 
                                    
                                
                                
                              
