Advertisement

सोलार पंप देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला दोन लाखांचा गंडा

प्रजापत्र | Friday, 14/10/2022
बातमी शेअर करा

केज(प्रतिनिधी)- तालुक्यातील तांबवा  येथील शेतात कृषी सोलार पंपासाठी शेतकऱ्याने कुसुम योजनेअंतर्गत पत्नीसह स्वतःच्या नावे अर्ज केले असता अनोळखी भामट्यांनी विविध शुल्क आकारणीच्या नावाखाली त्यांच्याकडून २ लाख ७ हजार १९८ रुपये जमा करून घेतले. आठ महिने उलटले तरी साहित्य न मिळाल्याने त्या शेतकऱ्याने अखेर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. 

 

 

अर्जुन राम रामराव चाटे (रा. तांबवा, ता. केज, ह.मु. दत्तनगर बीड) असे त्या फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विजेअभावी तांबवा येथील फळशेतीसाठी अडचण होत असल्याने त्यांनी १९ जानेवारी रोजी कुसुम योजनेअंतर्गत कृषी सोलार पंपासाठी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे दोन अर्ज करून करून एक्सिस बँकेच्या खात्यात ११ हजार २०० रुपये नोंदणी शुल्क जमा केले. दुसऱ्या दिवशी समीनराज नामक व्यक्तीने कॉल करून विविध कागदपत्रे दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने चाटे यांच्याकडून मंजुरी, अभियंत्याकडून स्पॉट पाहणी असे विविध कारणाखाली एकूण २ लाख ७ हजार १९८ रुपये जमा करून घेतले. त्यानंतरही समीनराज याने चाटे यांच्याकडे रकमेची मागणी सुरूच ठेवली. अखेर आठ महिने झाले तरी साहित्य अथवा अभियंता येत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अर्जुन चाटे यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून समीनराज नामक भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Advertisement

Advertisement