केज दि.११ - पाण्याच्या विद्युत मोटारीचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील वरपगाव येथे मंगळवारी ( दि. ११ ) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. संभाजी भक्ताजी बनसोडे असे शॉक लागून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
केज तालुक्यातील वरपगाव येथील संभाजी भक्ताजी बनसोडे ( वय २६ ) हा मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवित होता. मंगळवारी ( दि. ११ ) सकाळी ९ वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने पाण्याची विद्युत मोटार सुरू होती. याचवेळी आंघोळ करून घरात जात असताना या पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी हे घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथ उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. त्याच्या पश्चात पत्नी व एक सहा महिने वयाचा मुलगा आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.