केज - शेतात काम असलेल्या दाम्पत्याने पाऊस आल्याने शेतातील मंदिरात आसरा घेतला. याचवेळी मंदिरावर वीज कोसळल्याने पती - पत्नी दोघे जखमी झाल्याची घटना कोरेगाव ( ता. केज ) येथे रविवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. या जखमींना केज रुग्णालयातून अंबाजोगाईला रेफर केले आहे.
केज तालुक्यातील कोरेगाव येथील बळीराम गोवर्धन तांदळे ( वय ३५ ) व त्यांची पत्नी अनिता बळीराम तांदळे ( वय ३० ) हे दाम्पत्य रविवारी ( ( दि. ९ ) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेरी नावाच्या शेतात सोयाबीन पिकाची काढणी करीत होते. याचवेळी विजेच्या गडगडटासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे ते दोघे जवळच असलेल्या रानुबा मंदिरात निवाऱ्याला जाऊन बसले. त्यावेळी रानुबा मंदिरावर अचानक वीज कोसळली. त्यात बळीराम तांदळे व त्यांची पत्नी अनिता तांदळे हे दोघे जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.