अंबाजोगाई :(प्रतिनिधी ) ऐन सणाच्या काळात एक हृदयद्रावक घटना शहरात घडली आहे . नळाला आलेलं पिण्याचे पाणी भरण्याच्या धडपडीत एका मुलीला विद्युत शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे . शहरातील मिलिंदनगर ( गवळीपुरा ) भागात ही घटना दिनांक 3 सप्टेंबरला सायंकाळी घडली असून प्राजक्ता किशन गायकवाड ( वय 18 ) असं सदरिल मुलीचं नाव आहे .या घटनेमुळे मिलिंद नगर भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान नगरपरिषदेच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनाला आणि महावितरणच्या खंडित वीज पुरवठ्याला अंबाजोगाईकर कंटाळले असून दोन्ही यंत्रणाबद्दल तीव्र संताप करण्यात येत आहे . अंबाजोगाई शहरातील पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्याचं संपूर्ण नियोजन कोलमडले आहे .
पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासियांना 8 ते 10 दिवसांची वाट बघावी लागते . उन्हाळा , पावसाळा अगदी धरणं भरलं असतानाही ही समस्या बिचाऱ्या अंबाजोगाईकरांची सूटली नाही . शहरातील एखाद्या गल्लीत पाणी आले की , सर्व कामं सोडून लोकं पाणी साठवून ठेवण्यासाठी धडपड करत असतात . कारण त्यांना माहित आहे , नगरपरिषद पाणी सोडण्याचे दिवसं कमी करत नाही पण जास्त मात्र करुं शकते . पिण्याचे पाणी भरण्यासाठी धडपड करत असतानाच काल शहरातील मिलिंद नगर भागात दरम्यान अवेळी नळाला पाणी सुटल्याने पाणी भरण्यासाठी बाहेर जात असताना घराबाहेरील विद्युत खांबाला हात चिकटून तिला जोराचा शॉक लागला . तिला तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .
या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
शांत , नम्र , मनमिळाऊ प्राजक्ता आई - वडील मोलमजुरीला गेल्यानंतर दिवसभर घरातील काम करत लहान भावाची देखभाल करायची . प्राजक्ता शिवणकाम करत कुटूंबाला हातभार लावत असे . नुकताच तिने आयटीआयला शिवणकाम शिकण्यासाठी अर्ज दिलेला होता , सोमवारी तिला बोलावले होते . तिचे शिवणकामाचे शिक्षण घेऊन आपला मोठा व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न या दुर्घटनेमुळे भंगले आहे .