Advertisement

विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा मृत्यू!

प्रजापत्र | Sunday, 07/08/2022
बातमी शेअर करा

धारुर दि.7 : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.7) उघडकीस आली. ही घटना धारुर तालुक्यातील सुकळी येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

 

राणी गणेश राऊत (वय 21 रा.सुकळी ता.धारुर) असे विहिरीत बुडालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी हे माहेर असून तीन महिन्यापूर्वी गणेश राऊत या तरुणाशी विवाह झाला होता. रविवारी राणी ही पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. काठोकाठ भरलेल्या विहिरीचे पाणी घेतांना ती पाय घसरल्याने विहिरीत पडली. तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. विहीर खोल असल्याने प्रेत बाहेर काढण्यासाठी गावातील नागरिकांनी खुप प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्नीशमन दलाचे प्रमुख सुनिल आदोडे व त्यांच्या टिमने अथक परिश्रमानंतर प्रेत बाहेर काढले. घटनास्थळी सिरसाळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेळके, पोह.मिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने सुकळी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement