केज दि.२६ - तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील होळ येथे पोलिसांनी शेतात सुरू असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून पंधरा जुगाऱ्यावर कारवाई करीत २ लाख १७ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
केज तालुक्यातील होळ येथे बाळासाहेब नामदेव शिंदे यांच्या शेतातील गोठ्यात तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे याना एका गुप्त बातमीदारा कडून मिळाली. माहिती मिळताच दि. २५ जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि पोलीस उपनिरीक्षक औटी, पोलीस जमादार तुपारे, पोलीस कर्मचारी माने व खनपटे, महिला पोलीस समुद्रे यांच्या पथकाने होळ येथे पत्त्याच्या क्लबवर अचानक धाड टाकली. त्या वेळी सदर ठिकाणी गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असलेले मोहन माणीक ढवारे, दत्ता शिवाजी शिंदे, परमेश्वर नामदेव शिंदे, विलास बारकु राख, आत्माराम सुधाकर फुगारे, दादाराव शिवाजी कसबे, बाबासाहेब व्यंकटी घुगे, बालासाहेब नामदेव शिंदे, भैरुबा वैजनाथ शिंदे, अविनाश श्रीराम सरवदे, अभिजित ज्ञानोबा सावंत, नेताजी व्यंकटी लोमटे, विशाल गोवर्धन सोनवणे, आबासाहेब दादाराव शिंदे आणि सिध्देश्वर ज्ञानोबा शिंदे सर्व रा. होळ ता. केज जि. बीड हे आढळून आले. त्यांच्याकडील नगदी १ लाख १० हजार रु. आणि १४ मोबाईल असे मिळून एकूण २ लाख १७ हजार ७६० रु.चा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस जमादार सिताराम बळीराम डोंगरे यांच्या फिर्यादी वरून पंधरा जणांच्या विरुद्ध गु. र. नं. १०७/२०२२ जुगार प्रतिबंधक कायदा १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.