अंबाजोगाई - सोनपेठ (जि.परभणी) येथील पोलिसांनी चौकशीसाठी तब्यत घेतलेल्या बनसारोळा (ता. केज) येथील पारधी समाजाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात करण्यात आले. परंतु, हे शवविच्छेदन बेकायदेशीर असून मृत्यूचे खरे कारण समोर येण्यासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात त्रिसदस्यीय समिती अंतर्गत इन कॅमेरा दुबार शवविच्छेदन करण्यात यावे या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी शनिवारी (दि.०९) दिवसभर अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. अखेर त्यांची मागणी मान्य करत बीड जिल्हाधिकाऱ्यांनी मृतदेह औरंगाबादला हलविण्यात यावा असे आदेश सायंकाळी दिले.
देविदास बन्सी काळे (वय ३९) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या एका गुन्ह्यात बनसारोळा येथील पारधी वस्तीवरील काही संशयितांना ताब्यात द्यावे अशी विनंती सोनपेठ पोलिसांनी युसुफ वडगाव पोलिसांना केली होती. त्यानुसार युसुफ वडगाव पोलिसांनी देविदास बन्सी काळे, विशाल बापू काळे आणि शंकर भीमा काळे या तीन तरुणांना ३ जुलै रोजी सोनपेठ पोलिसांच्या हवाली केले. ४ जुलै रोजी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी पोलिसांनी तिन्ही तरुणांना बेदम मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. ५ जुलै रोजी त्यांना जमीन मंजूर झाला. दरम्यान, जामीन झाल्यानंतर सोनपेठ पोलिसांनी पुन्हा त्यांना चौकशीसाठी ठाण्यात आणले. पोलीस आपल्याला पुन्हा दुसऱ्या प्रकरणात अडकवतील अशी शंका आल्यामुळे देविदास काळे तिथून पळून गेला. त्यानंतर त्याचा मृतदेह सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतात आढळून आला. बेवारस मृतदेह म्हणून सिरसाळा पोलिसांनी मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आणून शवविच्छेदन केले. देविदासचा मृत्यू शेतीकुंपणातील विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाल्याचा पोलिसांचा दावा असून शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे कारण तेच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप
दरम्यान, पोलिसांनी ठाण्यातून पळून गलेल्या देविदासला सोनपेठ पोलिसांनी पुन्हा पकडले आणि ठाण्यात आणून त्याला बेदम मारहाण केली, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शवविच्छेदन करण्यापूर्वी आम्हाला मृतदेह दाखवला नाही किंवा आमची संमती घेतली नाही असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे देविदासच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्यासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात त्रिसदस्यीय समिती अंतर्गत इन कॅमेरा दुबार शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली. या मागणीसाठी त्यांनी शनिवारी दिवसभर अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.
दुबार शवविच्छेदनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी बीड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून नातेवाईकांना परस्पर झालेले शवविच्छेदन मान्य नसल्याचे सांगितले. या संदर्भाने शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी देविदास काळे याच्या मृतदेहाचे दुबार शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नियमानुसार करण्यात यावे असे आदेश दिले आहेत.