Advertisement

बनावट दारु कारखान्यावर पोलिसांचा छापा

प्रजापत्र | Friday, 08/07/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.8 (वार्ताहर) : येथील ग्रामीण पोलिसांनी एका बनावट दारु कारखान्यावर छापा टाकून पाच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी (दि.8) ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. एका फार्महाऊसमध्ये बनावट दारु कारखाना सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.

सतीश श्रीलालचंद हेला (वय 20), हरिओमकुमार श्रीबळीलाल सरोज (वय 19, दोघे रा.चकअहमदीपूर ता.मंझनपूर जि. कौशांबी), संतोषकुमार श्रीदशरथ सरोज (वय 25, रा.पवईया ता.मंझनपूर जि. कौशांबी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तिघे उत्तरप्रदेशातील असून स्थानिकाच्या मदतीने दारू निमिर्तीचा कारखाना चालवत होते. वरपगाव शिवारात एका फार्म हाऊसमध्ये बनावट दारू निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीआधारे ग्रामीण पोलिसांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी त्याठिकाणाहून 3 लाखांची बनावट दारू, 20 पोते रिकाम्या बाटल्या, दोन कॅन रयासन, 3 ड्रम, पॅकिंगसाठी वापरली जाणारी मशीन व तत्सम साहित्य, बनावट लेबल, पाणी उपशासाठीचा विद्यूत पंप असा एकूण मुद्देमाल 5 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्याठिकाणाहून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विट्ठल केंद्रे, पोलीस शिपाई स्वप्नील शिनगारे, महेश भागवत, बापूराव राऊत, कुलदीप खंदारे, बाळकृष्ण मुंडे, अनिल मिसाळ, मपोशि.मनिषा चाटे, चालक कमलाकर गायकवाड आदींनी केली.

 

Advertisement

Advertisement