दिल्ली : राज्यपालांनी दिलेल्या आदेशानूसार ठाकरे सरकारला उद्या विश्वासमत प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. विश्वासमत प्रस्तावाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी विश्वासमत प्रस्तावाचा निर्णय शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंत राज्यातील पेच कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेवून ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे सांगितल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना 30 जून रोजी विश्वासमत प्रस्तावाला सामोरे जाण्याचे निर्देश दिले होते. याला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दोन तासापेक्षा अधिक काळ सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विश्वासमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या याचिकेवरुन संबंधितांना नोटीसा काढण्यात आल्या असून त्यावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या निकालाला अधिन राहून आजचा विश्वासमत प्रस्ताव होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या सभागृहात काहीही झाले तरी राज्यातील पेच सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.