Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून नगरसेविकेच्या पतीचा परित्यक्ता महिलेवर अत्याचार

प्रजापत्र | Tuesday, 28/06/2022
बातमी शेअर करा

 केज दि.२८ - लग्नाचे आमिष दाखवून ३३ वर्षीय परित्यक्ता महिलेवर एका नगरसेविकेच्या पतीने दोन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवत गरोदर राहिल्यानंतर मूल खाली करण्याच्या गोळ्या दिल्या. लग्नास टाळाटाळ करू लागल्याने पीडित महिला ही पोलिसात तक्रार देण्यास गेली. मात्र लग्न करतो अशी थाप मारून परत बोलावून घेत त्याच्या नगरसेविका पत्नी व माजी पं. स. सदस्या आईसह दोन महिलांनी येऊन मारहाण करीत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

         पीडित ३३ वर्षीय महिला ही पतीसोबत घरगुती कारणावरून भांडण झाल्याने चार वर्षाच्या मुलीला घेऊन आईवडिलांकडे माहेरी राहत होती. पतीसोबत असलेले भांडण मिटविण्यासाठी पीडित महिला ही आईवडिलांना घेऊन केज नगरपंचायतीच्या नगरसेविका आशा कराड यांचे पती सुग्रीव माणिक कराड ( रा. तांबवा ता. केज ) याच्याकडे गेली होती. त्यांची ओळख झाल्यानंतर सुग्रीव कराड याने मला येऊन भेट, तुला नोकरी लावून देतो, नवऱ्यासोबतचे भांडण मिटवून नांदायला पाठवितो असे म्हणत भेटण्यासाठी आग्रह धरला. मात्र पीडितेने भेटण्यास नकार दिला. त्यानंतर ८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ७.३० वाजता पीडिता ही कोविड सेंटरमध्ये कामाला जाण्यासाठी बस स्थानकावर थांबली असता सुग्रीव याने तिला बळजबरीने एका चार चाकी गाडीत बसवून केज येथील त्याच्या सुजित हॉटेलवर आणले. तिने विरोध करून ही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दोन वर्षांपासून त्याने लग्नाचे आमिष दाखवून सतत त्या हॉटेलवर नेऊन शरीर संबंध ठेवले. त्याच काळात पीडित महिला ही दोन महिन्याची गरोदर राहिल्यानंतर त्याने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास देऊन गर्भ खाली केला. तिने लग्नाची मागणी करताच तू खालच्या जातीची आणि माझ्याहून लहान आहेस असे म्हणत लग्न करण्यास टाळले. त्यानंतर पीडित ही पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात नर्सची नोकरी करीत असताना एप्रिल २०२२ या महिन्यात पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. मात्र मूल खाली न झाल्याने पीडिता महिला ही पुणे जिल्ह्यातील  औंध येथील एका रुग्णालयात भरती झाली. डॉक्टरांनी तुमच्या सोबत व्यक्तीला बोलवा सांगितल्याने तिने सुग्रीव यास फोन लावून बोलावले. मात्र तो आला नाही. तिथे आठ ते दहा उपचार घेऊन गर्भपात केल्यानंतर त्याने १३ मे २०२२ पासून फोन न उचलणे, बोलण्यास टाळू लागल्याने शेवटी दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला. मात्र त्याने भांडू नको औषध पी असे त्याने सांगितल्याने रागाच्या भरात तिने विषारी औषधाचे सेवन केले. पुण्यात उपचार घेऊन व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा तो तिच्याशी बोलत होता. २६ जून २०२२ रोजी पीडित हीने सुग्रीव याच्या गाडीत एका महिलेस पाहून तिने त्याचा स्कुटीवर पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला गाठता न आल्याने पीडित महिला पोलिसात तक्रार देण्यास आली. हे समजताच त्याने तिला फोन करून तुझ्याशी लग्न करतो अशी थाप मारून परत बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी २७ जून रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी येऊन सुग्रीव कराड, नगरसेविका पत्नी आशा कराड, त्याची आई माजी पं. स. सदस्या मुक्ता कराड, मीरा मच्छिंद्र चाटे व एक अनोळखी महिला या पाच जणांनी येऊन केसाला धरून लाथाबुक्याने व चापटाने मारहाण केली. पीडितेच्या आईवडीलास ही मारहाण केली. पीडितेचा १३ हजार रुपयांचा मोबाईल, तिच्या आईचा दीड हजाराचा मोबाईल घेऊन जात तू गावात कशी राहतेस, तुझ्यावर खोट्या केस करतोत अशा धमक्या दिल्या. अशी फिर्याद महिलेने दिल्यावरून सुग्रीव कराड, नगरसेविका आशा कराड, मुक्ता माणिक कराड, मीरा चाटे व एक अनोळखी महिला या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या फौजदार सीमाली कोळी पुढील तपास करत आहेत. 

 

 

नगरसेविकेच्या तक्रारीवरून पीडित महिलेवर खंडणीचा गुन्हा 
नगरसेविका आशा कराड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या नगरसेविका आणि त्यांची सासू या पंचायत समिती सदस्य असल्याने पती सुग्रीव कराड हे जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास आणि भांडण तंट्यात मध्यस्थी करतात. सुग्रीव कराड यांनी सदरील महिलेचा पतीसोबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तिने घर प्रपंच चालविण्यासाठी पैसे मागितल्याने तिला पैसे दिले होते. मात्र त्यानंतर तिने बदनामी करण्याची धमकी दिल्याने २५ हजार रुपये दिले. पुन्हा ती ब्लॅकमेल करु लागल्याने कधी २५ हजार तर कधी ५० हजार रुपये असे अडीच लाख रुपये दिले. २७ जून रोजी सकाळी ७ वाजता पती, सासूला घेऊन तिला समजावून सांगण्यास गेलो असता तिने १२ लाख रुपये द्या नसता बलात्काराची केस करीन अशी धमकी देऊन ठाण्यात आली. अशी फिर्याद नगरसेविका आशा कराड यांनी दिल्यावरून पीडित महिलेविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार राम यादव हे करीत आहेत.  
 

Advertisement

Advertisement