Advertisement

धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 27/06/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.27 जुन – धारुर (Dharur) तालुक्यातील पिंपरवाडा येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. पेरणीचे दिवस असताना जुने कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने रविवारी (दि.26) रात्री मृत्यूला कवटाळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी आत्महत्येची तालुक्यातील ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.

 

 

सतिश नामदेव तिडके (वय 38) असे आत्महत्या ( Suicide ) केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपरवाडा येथे नामदेव तिडके यांचे कुटूंब राहते. त्यांना गावात जवळपास दहा एकर कोरडवाहू जमिन आहे. या शेतातच शेती करुन तिडके कुटूंबियांची उपजिविका भागते. मात्र शेतीसाठी सतत कर्जाचा बोजा घेतला जात होता. या कर्जाला कंटाळूनच कुटूंबातील तरुण शेतकरी सतिश याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृत शेतकरी सतिश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे.

 

 

रविवारी सायंकाळी घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Suicide) केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद धारुर पोलीसांत (Police) करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धारूर ग्रामिण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृत तरुण शेतकऱ्याचे पार्थिव आणण्यात आले. तरुण शेतकरी सतिश याच्या आत्महत्येमुळे पिंपरवाडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची संख्या चिंताजनक आहे. एकट्या माजलगाव तालुक्यात गेल्या पाच वर्षात 75 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. धारुर तालुक्यातही शेतकरी आत्महत्येची संख्या चिंतेत वाढ करणारी आहे. गेल्याच आठवड्यात तालुक्यातील सोनिमोहा येथे दि.18 जुन रोजी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आठवडाभरातच तालुक्यात शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना समोर आली आहे.
 

Advertisement

Advertisement