केज दि.२४ – येथील नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर कौटुंबिक वादातून कार्यालयात झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
दि. ६ जून रोजी दुपारी १२ वा. च्या दरम्यान केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने तहसील कार्यालयाच्या आस्थापना विभागात धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता.नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या तक्रारी वरुन दि. ७ जून रोजी मधुकर वाघ याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सखोल चौकशी करून तपास करून तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी हल्लेखोरांच्या कटात सहभागी असणे आणि हल्ल्यास प्रवृत्त केल्याच्या कारणा वरून दुसरा आरोपी महेबूब शेख याला नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या वरील धारदार कोयत्याने खुनी हल्ला प्रकरणातील दुसरा आरोपी महेबूब शेख याला दि. २७ जून पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.